अंधश्रद्धेतून छळप्रकरणी पाच वर्षाचा कारावास
By Admin | Updated: February 15, 2015 00:33 IST2015-02-15T00:33:20+5:302015-02-15T00:33:20+5:30
सुनेशी पटत नसल्यामुळे तिला घरातून हाकलून लावण्यासाठी मांत्रिक महिला व अन्य नातेवाईकांच्या मदतीने षडयंत्र रचणे सासूला भोवले.

अंधश्रद्धेतून छळप्रकरणी पाच वर्षाचा कारावास
भंडारा : सुनेशी पटत नसल्यामुळे तिला घरातून हाकलून लावण्यासाठी मांत्रिक महिला व अन्य नातेवाईकांच्या मदतीने षडयंत्र रचणे सासूला भोवले. सुनेच्या तक्रारीवरुन मुख्य न्यायदंडाधिकारी महेश लोणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने तीन जणांना पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पौर्णिमा रविंद्र वाहने (६१), निर्मला किरण वाहने (६१) रा. वरठी, मांत्रिक विश्वकला चिंतामण कांबळे (५५) रा. कारधा अशी आरोपींची नावे आहेत. राजश्री संदीप वाहने (२२) असे फिर्यादीचे नाव आहे.
वरठी येथील राजश्री संदिप वाहने ही विवाहीता पौर्णिमा वाहने यांची सून आहे. घरात सासूचे सूनेशी पटत नसल्याने ती राजश्रीचा छळ करत होती. बऱ्याचवेळा सासूने सुनेला घरातून हाकलून लावण्याचासुध्दा प्रयत्न केला. परंतु आपला टिकाव लागत नसल्याचे पाहून तिने अंधश्रध्देचा आधार घेतला. निर्मला किरण वाहने या नात्यातील महिलेच्या मदतीने त्यांनी कारधा येथील विश्वकला चिंतामण कांबळे या मांत्रिक महिलेला घरी बोलवून घेतले.
राजश्रीची प्रकृती बरोबर राहत नसल्याचे सांगून तिला बरे करण्यासाठी मांत्रिकेला बोलावून घेतल्याचे सांगितले. २८ एप्रिल रोजी मांत्रिकेसह दोघांनीही संगनमत करुन अंधश्रध्देतून अघोरीपूजा सुरु केली. लिंबू, कवड्या, धुपाटण्याचा वापर करीत राजश्रीवर झाडफूक करुन त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला. आपल्यावर अंधश्रध्देपोटी सुरु असलेल्या या मांत्रिक जाचामूळे राजश्री घाबरली. हा जाच असह्य झाल्याने तिने ३० एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी या तिघांवरही फौजदारी गुन्हा दाखल केला. हे प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरु होते.
याप्रकरणी न्यायालयाने तपासलेल्या साक्षी व पुराव्याच्या आधारे या तिन्ही आरोपींची शिक्षा निश्चीत केली. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्या प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३ अन्वये दोषी असल्याचे सिध्द झाल्याने तिन्ही महिला आरोपींना प्रत्येकी ५ वर्षाची शिक्षा, २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा ६ महिन्याच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ५० हजार रुपये फिर्यादी राजश्री वाहने हिला देण्याचे आदेश मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायाधीश महेश लोणे यांनी दिले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने विजय तामगाडगे यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)