मारहाणप्रकरणी आरोपीला पाच वर्षांचा कारावास
By Admin | Updated: October 16, 2014 23:19 IST2014-10-16T23:19:32+5:302014-10-16T23:19:32+5:30
मोकळ्या जागेत स्नानगृह उभारण्यासाठी झालेल्या बांधकामासंदर्भात उद्भवलेल्या वादातून एका इसमाने ४७ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश

मारहाणप्रकरणी आरोपीला पाच वर्षांचा कारावास
भंडारा : मोकळ्या जागेत स्नानगृह उभारण्यासाठी झालेल्या बांधकामासंदर्भात उद्भवलेल्या वादातून एका इसमाने ४७ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी तपासाअंती व साक्षीदारांच्या बयानानंतर आरोपी अचित नीळकंठ नंदेश्वर याला पाच वर्षांचा कठोर कारावास व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ही घटना दोन वर्षांपूर्वी भंडारा तालुक्यातील डोडमाझरी टेकेपार येथे घडली होती. उर्मिला मनोज शिंगाडे असे या प्रकरणातील जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
डोडमाझरी येथे नंदेश्वर व शिंगाडे यांचे लागूनच घर आहे. घराशेजारील मोकळ्या जागेत बांबू गाडून त्यात पोते व तुराट्या तसेच दगडाचा वापर करून बाथरुम तयार करण्याचे ठरविले. याच प्रकारचे स्नानगृह शिंगाडे यांचे होते. याच बाथरुम जवळ संगम नंदेश्वर याने बाथरुम तयार करण्याकरिता लाकडी खांब गाडत होता.
यावेळी उर्मिला शिंगाडे यांनी माझ्या घराच्या बाथरुमजवळ बांबू का गाडतोस असे हटकले असता संगम नंदेश्वर हा तिथून निघून गेला. परंतु त्याचा मोठा भाऊ अचित नंदेश्वर याने सुनियोजितपणे तिथे जाऊन उर्मिला शिंगाडे यांच्याशी वाद करून तिला काठीने मारहाण केली. तसेच तोंडावर, डोक्यावर, कपाळावर, पाठीवर मारहाण केली. यात उर्मिला शिंगाडे या बेशुद्ध झाल्या. शिंगाडे यांची भाची पूनम गडपायले व शेजाऱ्यांनी उर्मिला यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर जखमा असल्यामुळे शिंगाडे यांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले.
भंडारा पोलीस ठाण्यात पूनम गडपायले हिने नंदेश्वर विरुद्ध तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी नंदेश्वर विरुद्ध भादंविच्या ३०७, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध पुरावा आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
याप्रकरणी वच्छला शिंगाडे, मंगला गडपायले, उर्मिला शिंगाडे, वैद्यकीय अधिकारी सुयोग कांबळे, शेखर गभणे, पोलीस हवालदार देवीदास बागडे, तपासीय अधिकारी संजय खंडारे यांची न्यायालयात साक्ष घेण्यात आली. साक्ष पुरावा, जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र, क्युरी रिपोर्ट, वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी अचित नंदेश्वर याला आरोपी ठरविण्यात आले. तसेच त्याला कलम ३२५ भादंविच्या गुन्ह्यांतर्गत पाच वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड तसेच ५०४ कलमांतर्गत एक वर्षाचा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायाधिशांनी आदेशात उर्मिला शिंगाडे यांना दंडाच्या रकमेतून दुखापत मोबदला म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. याप्रकरणाची गावपरिसरात चर्चा आहे. आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)