पाच अभयारण्यात होणार वन्यप्राणी गणना
By Admin | Updated: May 13, 2014 23:17 IST2014-05-13T23:17:18+5:302014-05-13T23:17:18+5:30
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आज जिल्ह्यातील पाचही अभयारण्यात प्राणी गणना होणार आहे.

पाच अभयारण्यात होणार वन्यप्राणी गणना
भंडारा : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आज जिल्ह्यातील पाचही अभयारण्यात प्राणी गणना होणार आहे. नागझिरा, न्यू नागझिरा, कोका, नवेगाव ही अभयारण्य तसेच नवेगाव नॅशनल पार्क या ठिकाणी ही प्राणीगणना होईल. याशिवाय प्रादेशिक विभागांतर्गत येणार्या जंगलात नैसर्गिक पानवठय़ावर वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे २00 मचानी बांधण्यात आल्या असून एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत. वन विभागाने ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले असून वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणांचीही नोंद घेण्यात येणार आहे. रात्रीच्या तारे भरल्या आकाशात पूर्णचंद्र व त्याच्या प्रकाशात किर्र जंगलात पाणवठय़ाशेजारी एखाद्या मचाणावर बसून जंगलातील वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात येईल. या पाचही अभयारण्यात अनेक पाणवठे आहेत. या पाणवठय़ांवर विविध वन्यप्राणी येत असतात. काही ठिकाणी वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी जंगलात विशेष पाणवठे बांधून टँकरद्वारे पाणी सोडले जाते. अशा पाणवठय़ाशेजारी उंच जागेवर मचाण बांधण्यात आलेल्या आहेत. यावर्षी सुमारे २00 मचानी बांधण्यात आलेल्या आहेत. या मचानीवर वन कर्मचारी, वन्यजीव प्रेमी राहणार आहेत. संपूर्ण दिवस व संपूर्ण रात्र जंगलात वन्यजीवांची माहिती निरीक्षण वहीत नोंदविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)