नऊ वर्षांपासून पाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
By Admin | Updated: July 5, 2014 23:24 IST2014-07-05T23:24:54+5:302014-07-05T23:24:54+5:30
राज्य शासन संचालित सात पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी पाच दवाखान्यात मागील नऊ वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. येथे मंजूर परे १७ असून रिक्त पदांची संख्या १० आहे.

नऊ वर्षांपासून पाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
तुमसर : राज्य शासन संचालित सात पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी पाच दवाखान्यात मागील नऊ वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त आहेत. येथे मंजूर परे १७ असून रिक्त पदांची संख्या १० आहे. एक लक्ष पशुंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्य शासन संचालित दवाखाने तुमसर, हरदोली, खापा(तुमसर), देव्हाडी, चुल्हाड, मिटेवानी, गोबरवाही येथे आहेत. त्यापैकी केवळ तुमसर व हरदोली येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर उर्वरित पाच दवाखाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत. येथे चतुर्थश्रेणी कर्मचारीच डॉक्टरची भूमिका वठवित आहेत.
तुमसर येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी वर्ग एक या पदावर डॉ.मंगेश काळे कार्यरत आहेत. तर हरदोली येथे डॉ.सुरेश भेलकर वर्ग एक सध्या कार्यरत आहेत. उर्वरित पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग दोन हे पद आहे. सात दवाखान्यात मंजूर पदे १७ असून त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. तुमसर तालुक्यात ६३ हजार ९९९ गाई व म्हशी असून ३० हजार २१ शेळ्या, २४ हजार ८४६ कोंबड्या आहेत.
तुमसर केंद्राअंतर्गत १४ गावे, खापा-८ गावे, हरदोली-११ गावे, देव्हाडी-९, मिटेवानी -५ गोबरवाही-७, चुल्हाड-५ गावांचा समावेश आहे. खापा(तुमसर) येथे दि. १ आॅगस्ट २००४ तर देव्हाडी, चुल्हाड, मिटेवानी व गोबरवाही येथे दि. २२ एप्रिल २००५ पासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. शासनाच्या नियमानुसार वंध्यत्व निवारण, गोचीड गोमाशा, औषधोपचार, खच्चीकरण, लसीकरण शिबिर राबविण्याचे बंधन आहे.
राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी या दवाखान्यावर होती. पाच दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीत. त्यामुळे हे सर्व शिबिरे तुमसर व हरदोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी राबविल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येते. नऊ वर्षापासून सर्व शिबिरे व योजना निश्चितच कागदोपत्री होत असतील यात शंका नाही. राज्य शासनच उदासीन असल्याने पशुंचे आरोग्य धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)