ंएकता मंच पाच जागा लढविणार !
By Admin | Updated: June 19, 2015 01:02 IST2015-06-19T01:02:27+5:302015-06-19T01:02:27+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थक असल्यामुळे आम्ही भाजपसोबत युती केली आहे.

ंएकता मंच पाच जागा लढविणार !
सुलेखा कुंभारे : स्वबळावर निवडणूक लढणार नाही
भंडारा : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थक असल्यामुळे आम्ही भाजपसोबत युती केली आहे. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने जिल्हा परिषदेच्या पाच जागा लढविणार असून त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष अॅड.सुलेखा कुंभारे यांनी गुरुवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, कामठी नगर परिषदेत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे सांगून युती ही केवळ विदर्भ राज्याच्या समर्थनाकरीता असल्याचे स्पष्ट केले. एकता मंचने भाजपला पाच जागांचा प्रस्ताव दिला असून त्यासंदर्भात भाजपचे नेते ना.नितीन गडकरी, खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा सुरू आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात दादासाहेब कुंभारे यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. त्यांनी बीडी कामगारांना न्याय दिल्याचे सांगून त्या म्हणाल्या, पेट्रोलपंप (ठाणा) या जिल्हा परिषद गटासाठी शशीकांत मेश्राम यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. युती धर्म पाळावा लागत असल्यामुळे अन्य जागासंदर्भात चर्चेतून तोडगा निघेल. पाच जागा कोणत्या या प्रश्नावर ते नंतर कळविण्यात येईल असे सांगून युतीमध्ये जागा वाटपात तोडगा निघाला नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अॅड.प्रभात मिश्रा यांच्यासह पेट्रोलपंप ठाणा येथील कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)