पाच महिन्यांत १४८ अर्भक मृत्यू
By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:08:57+5:302014-09-27T23:08:57+5:30
गर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते.

पाच महिन्यांत १४८ अर्भक मृत्यू
आरोग्य यंत्रणा खिळखिळी : २५ बालकांसह सहा मातांचा मृत्यू
प्रशांत देसाई - भंडारा
गर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते. यावर शासनाच्या वतीने लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात पाच महिन्यात १४८ अर्भक मृत्यू झाले आहे. तर २५ बालमृत्यू असून ६ मातामृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शासनाकडून गर्भवती महिला व बालकांवर लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात १४८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. तर १ ते ५ वयोगटातील २५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून याच कालावधीत सहा मातांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने गर्भवती माता व बालकांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाची यंत्रणा योजना चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्या आहेत.
गर्भवती मातांना गर्भावस्थेत शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या योजना व सकस आहार अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाते. याचा लाभ घेण्याकरिता गर्भवती महिलेची अंगणवाडी केंद्रात नोंद करणे गरजेचे आहे. त्यांनतर गर्भवती महिलेला माता व बाल संगोपन करण्यासंबधीत माहिती अंगणवाडी केंद्रातील सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून दिली जाते.
अंगणवाडीतून गर्भवती महिलेला जीवनसत्वयुक्त सकस आहार मोफत दिल्या जाते. तिचे दर महिन्याला अंगणवाडी केंद्रात वजन केल्या जाते. मानव विकास योजनेंतर्गत गर्भवती महिलेला आठव्या महिन्यात दोन हजार रूपये दिल्या जाते.
प्रसुतीनंतर दोन हजार असे चार हजार रूपये शासनाकडून दिल्या जाते. यासोबतच जननी सुरक्षा योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व बीपीएल प्रवर्गातील महिलांना प्रसूतीनंतर सातशे रूपये देण्यात येते.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांना घरून दवाखान्यापर्यंत व प्रसुतीनंतर दवाखान्यातून घरी पोहचविण्याची मोफत सुविधा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण जनतेची नाळ जुडून असलेल्या शासकीय रूग्णालयात सुविधा नसल्या तरी अनेकांची प्रथम पसंती याच रूग्णालयाला आहे. सात तालुक्याच्या भंडारा जिल्हा मुख्यालयी जिल्हा सामान्य रूग्णालयाची निर्मिती केली आहे. पाच महिन्यात जिल्ह्यात मृत्यूने तांडव घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.