रेल्वे अंडरपास पुलात पाच फूट पाणी,१०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:45+5:302021-07-18T04:25:45+5:30
तुमसर रोड - तिरोडी या रेल्वे मार्गावर देव्हाडी, शिवनी, कोष्टी शिवारातील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम केले ...

रेल्वे अंडरपास पुलात पाच फूट पाणी,१०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद
तुमसर रोड - तिरोडी या रेल्वे मार्गावर देव्हाडी, शिवनी, कोष्टी शिवारातील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने अंडरपास पुलाचे बांधकाम केले आहे. सध्या पुलात सुमारे पाच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे देव्हाडी येथील सुमारे १०० शेतकरी अंडरपास पुलातून जाणे-येणे करू शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतीवर जाण्याकरिता या पुलातून मार्गक्रमण करावे लागते. शेतकरी खरीप हंगामात ट्रॅक्टर व इतर साहित्य घेऊन या पुलातून जाऊ शकत नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु त्याकडे गत पाच वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अंडरपास पुलातून पाणी काढण्यास जागा नाही. त्यामुळे हे पाणी अनेक दिवस येथे साचून राहते. पाण्याचे निकासी करण्याचे कोणतेही नियोजन प्रशासनाने केले नाही. हा अंडरपास पूल शेतशिवारात असल्यामुळे पाण्याचा निचरा येथे मोठ्या प्रमाणात होतो. रेल्वेच्या स्थापत्य अभियंत्यांनी पाणी निकासीचे नियोजन येथे चुकल्याचे दिसून येते. रेल्वे प्रशासनाने लक्षावधी रुपये खर्च करून हा अंडरपास पूल शेतकऱ्यांना जाण्याकरिता तयार केला. परंतु त्याचा कोणताच फायदा होताना दिसत नाही. रेल्वेच्या अनेक अंडरपास पुलात पाणी जमा राहते, अशी माहिती आहे.
अंडरपास पुलातून महिला शेतकरी वर्ग जाणे-येणे करू शकत नाही. सुमारे दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होते. शेती कामावर जाण्याकरिता दूरवरून शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जावे लागते. अंडरपास पूल बांधकामाचा कोणताच फायदा येथे होताना दिसत नाही. उलट शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून देण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.