मत्स्य कंत्राटचे ८४ हजार देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: October 19, 2015 00:48 IST2015-10-19T00:48:14+5:302015-10-19T00:48:14+5:30
पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने डोंगरदेव तलावाचा मत्स्य उत्पादनाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये प्रमाणे ....

मत्स्य कंत्राटचे ८४ हजार देण्यास टाळाटाळ
कारवाईची मागणी : अधिकाऱ्यांना निवेदन
करडी (पालोरा) : पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने डोंगरदेव तलावाचा मत्स्य उत्पादनाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता लेंडेझरी (जांभोरा) येथील जय भोले मत्स्य पालन सहकारी संस्थेला दिला होता. तीन किस्त बरोबर दिल्यानंतर सदर संस्था दोन किस्तीचे ८४ हजार रुपये देण्यास वारंवार टाळाटाळ करीत आहे. प्रकरणी अनेकदा नोटीस देण्यात आली. मात्र नोटीस घेण्यासही नकार देत असल्याने कारवाई करण्याची मागणी पालोरा संस्थेनी केली आहे. निवेदन वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला डोंगरदेव येथील पाणी वापर तलाव सलग्न आहे. त्याचबरोबर मागील वर्षी डोंगरदेव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था पालोरा येथील संस्थेत विलीन करण्यात आली आहे. पालोरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे आदी गावे पालोरा संस्थेत समाविष्ठ आहेत. डोंगरदेव पाणी वाटप तलाव सलग्न असल्यामुळेच सदर तलावाचे मत्स्य उत्पादनाचा ठेका लेंडेझरी येथील जय भोले मत्स्य पालन सहकारी संस्थेला देण्यात आला होता. ठेका पाच वर्षाकरिता देण्यात आलेला होता. संस्थेला पाच वर्षाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये याप्रमाणे पाच किस्तीमध्ये देण्यात आला होता. लेंडेझरी संस्थेने लीज ठेक्याची तीन वर्षाची रक्कम बरोबर दिली. परंतु उर्वरीत दोन किस्तीचा ठेका देण्यास टाळाटाळ करीत आहे. दोन किस्तीची एकूण ८४ हजार रुपये अजूनपर्यंत भरणा केलेली नाही.
शासनाचे आदेशानुसार डोंगरदेव संस्था विलीन झाली असल्याने पालोरा येथील संस्था वारंवार संबंधित लिजची रक्कम भरण्यास सांगत असताना लेंडेझरी संस्था दुर्लक्ष करीत आहे.
रक्कम भरण्यासंबंधी अनेकदा नोटीस व पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र नोटीस घेण्यासही मत्स्य पालन संस्था लेंडेझरी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सदर रक्कम मिळण्यासाठी पालोरा येथील संस्थेने सहाय्यक आयुक्त, मत्स्य पालन भंडारा यांना निवेदन दिले आहे. कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, आमदार चरण वाघमारे, खंडविकास अधिकारी मोहाडी यांनाही कारवाईसाठी कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)