मत्स्य व्यवसायात जिल्हा अग्रेसर करु
By Admin | Updated: June 11, 2017 00:19 IST2017-06-11T00:19:35+5:302017-06-11T00:19:35+5:30
पूर्व विदर्भात सद्यस्थितीत मत्स्यपालन अत्यंत कमी असून मत्स्यव्यवसायाला मोठया प्रमाणात वाव आहे.

मत्स्य व्यवसायात जिल्हा अग्रेसर करु
सुहास दिवसे : तलाव तेथे मासोळी अभियान राबविणार, ६३ तलावांची केली निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पूर्व विदर्भात सद्यस्थितीत मत्स्यपालन अत्यंत कमी असून मत्स्यव्यवसायाला मोठया प्रमाणात वाव आहे. असे असतांना भंडारा जिल्ह्यात सुध्दा मत्स्यव्यवसाय कमी असून सहकारी संस्थांमध्ये संघटित मच्छिमार समुदायाकडे जलाशय स्त्रोत वापरण्याचे अधिकार आहेत. मात्र मत्स्यपालनासाठी व व्यवसायासाठी लागणारी साधनं अपूरी असल्याने मत्स्यव्यवसाय मोठया प्रमाणात होत नाही. तलाव तेथे मासोळी या अभियानाद्वारे मच्छीमार संस्थांना साधनं व सुविधा देण्याचा शासनाचा निर्धार असून याद्वारे भंडारा जिल्हा मत्स्योत्पादनात अग्रेसर करु, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय वि. का. पसारकर व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ह. र. पाटील यावेळी उपस्थित होते.
मासे पालनासाठी यावर्षी ६३ तलावाची निवड करण्यात आली असून या तलावात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मत्स्यजिरे टाकण्यात येतील. यावर्षीच तलाव तेथे मासोळी अभियान सुरु केले असून या अभियानांतर्गत संस्थांना सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. शासन सुविधा पुरवीत असले तरी सहकारी संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मासे उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. एके काळी मासे उत्पादन करण्याचे आपले स्वप्न होते असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, या जिल्ह्यात मासेमारीला मोठया प्रमाणात वाव असून आपण एकत्रितपणे मासे उत्पादन वाढवू या आणि तुमच्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण करु, असे त्यांनी सांगितले.
या अभियानाचे हे पहिले वर्ष असून यावर्षी चांगले उत्पादन करण्याचे आव्हान स्विकारा, पुढील वर्षी मानवी विकास मिशन व जिल्हा नियोजन मधून यासाठी वेगळया निधीची तरतूद करण्याची हमी देतो, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. गोड्या पाण्याच्या मासोळीला मोठी मागणी आहे. त्यामुळे आपल्याकडील मासे इतर राज्यात निर्यात होवू शकतात. यासाठी शीतगृहे जिल्ह्यात उभारण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखविला.