पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

By Admin | Updated: June 28, 2014 00:55 IST2014-06-28T00:55:49+5:302014-06-28T00:55:49+5:30

उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना ...

On the first day, locked school was locked | पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

अड्याळ : उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना सालेवाडावासीयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या दप्तर दिरंगाई कारभाराचा परीचय घडवून दिला. मागील तीन वर्षापासून इमारत बांधकामाचा प्रश्न निकाली न निघाल्याने पालकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन केले.
पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत सालेवाडा येथे १ ते ४ वर्ग असून २५ विद्यार्थी शिकत आहेत. येथील इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने मागील तीन वर्षापासून प्रसुतीगृहाच्या एका खोलीत चारही वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरवीत आहे. नवीन इमारत संबंधाने मागील तीन वर्षात अनेकदा निवेदन देण्यात आले. ग्रामशिक्षण समितीने ठराव घेऊन शिक्षण विभागाकडे पाठविला. मात्र आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. शिक्षण विभागाचे अधिकारी नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगून केवळ वेळ मारुन नेत आहेत.
इमारतीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना प्रशासन गंभीर नसल्याने पहिल्याच दिवशी आंदोलन करुन विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सरपंच गौतम गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती रंजन वाढवे, छावा संग्राम संघटनेचे जिल्हा सचिव मुनीर शेख, नितीन वरगंटीवार, विनोद गंधे, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण समिती सदस्यांच्या नेतृत्वात पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. सकाळी मुख्याध्यापिका थाटकर व शिक्षक आंधळे शाळेत आले असता आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यांनी गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके व केंद्रप्रमुख प्रमोदकुमार अणेराव यांना माहिती दिली. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता. अधिकाऱ्यांनी सालेवाडा गाठून पालकांची समजूत घातली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारुन प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली. गटशिक्षणाधिकारी तिडके यांनी नऊ महिन्याच्या आत प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
एकीकडे उत्साहाच्या वातावरणात गोड जेवणाने, पुष्पगुच्छाने स्वागत करुन विद्यार्थ्यांना प्रवेशित केले जात असताना सालेवाडा येथील विद्यार्थ्यांचे शाळेला कुलूप ठोकून स्वागत केले. यामुळे कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती विद्यार्थ्यांवर ओढवल्याने शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: On the first day, locked school was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.