लाखांदुरात भंगार दुकानाला आग
By Admin | Updated: May 23, 2017 00:18 IST2017-05-23T00:18:40+5:302017-05-23T00:18:40+5:30
येथील लाखांदूर-वडसा महामार्ग लगत शिवनगरी ले-आउट मध्ये दीनानाथ हटवार यांच्या कबाडीच्या दुकानाला सोमवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

लाखांदुरात भंगार दुकानाला आग
अनर्थ टळला : दोन लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील लाखांदूर-वडसा महामार्ग लगत शिवनगरी ले-आउट मध्ये दीनानाथ हटवार यांच्या कबाडीच्या दुकानाला सोमवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले. ही आग शार्टसर्किटने लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.
लाखांदूर येथील शिवनगरी ले-आऊटमध्ये ढोरे यांच्या मालकीच्या जागेवर दीनानाथ हटवार यांचे कबाडीचे दुकान मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या व्यवसायावरच ते उदरनिर्वाह करतात. सोमवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास याठिकाणी अचानक आग लागली. त्यामध्ये जवळपास दोन लाख रूपयांचे कबाडी साहित्ये जळून खाक झाले. या दुकानात कुणीही नसल्यामुळे मनुष्याला त्याचा धोका पोहोचला नाही. घटनेची माहिती होताच घटनास्थळी नगरपंचायतचे उपाध्यक्ष नरेश खरकटे यांनी भेट दिली. संबंधित विभागाला घटनेची माहिती दिली. या घटनेच्यावेळी शहरातील विद्युत प्रवाह ठप्प झाला होता. त्यानंतर प्रभारी तहसीलदार विजय कावळे, सहायक अभियंता लाखांदूर, पोलीस कर्मचारी किशोर फुंडे, साठवणे, होमगार्ड वैद्य उपस्थित होते. यावेळी घटनेचा पंचनामा तलाठी बाळबुद्धे यांनी केला.
यावेळी आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी नगरसेवक रामचंद्र राऊत, नरेश खरकाटे, हरीष बागमारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.