गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:24 IST2017-02-26T00:22:28+5:302017-02-26T00:24:24+5:30
गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली.

गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग
अनर्थ टळला : आंबागड किल्ला परिसरातही आगीने वनसंपदा स्वाहा
तुमसर : गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. वणवा पेटलेल्या जागेपासून १० ते १२ फूट अंतरावर चारचाकी वाहनतळ होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती.
गायमुख येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. सातपुडा पर्वत रांगात हे यात्रा स्थळ आहे. दीड ते दोन लाख भाविक यात्रेनिमित्त येतात. शुक्रवारी रात्री लोहारा मार्गावरील या जंगलात आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीनंतर वाहनधारकांनी वाहने तिथून हलविले. अन्यथा अनर्थ घडला असता.
मोहाडी तालुक्यातील गायमुख यात्रास्थळी तुमसर, मोहाडी तालुक्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. आग कुणी लावली याची माहिती कुणालाही नाही. आगीचे लोळ दिसल्याने एकच धावपळ उडाली. परतीच्या मार्गावर ही आग असल्याने भाविकांनी काढता पाय घेतला. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलातील झाडांची पाने गळून पडल्याने पालापाचोळा व गवत सध्या वाळलेले आहे. त्यामुळे आग जंगल परिसरात लवकर पसरते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला भाविकांचे जत्थे होते. त्यांच्यात भीतीचे सावट पसरले होते. (तालुका प्रतिनिधी)
गायमुख यात्रा परिसरात अंधार
विदर्भात लहान महादेव म्हणून गायमुख प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात विजेची सोय आहे. मंदिर प्रवेशद्वारानंतर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. आंबागड तथा लोहारा रस्त्याशेजारी भाविकांचे जत्थे होते. त्यांनी शेतात आश्रय घेतला होता. लोहारा रस्त्यावर कुठेही प्रकाश व्यवस्था नाही. प्रशासनाने यात्रेनिमित्त विजेची व्यवस्था करणे गरजेचे होते. पुरूष भाविकांसोबत महिला भाविकांची संख्या मोठी होती. रात्री हा परिसर काळोखात असतो. महिला भाविक येथे सुरक्षित राहू शकत नाही.
आंबागड किल्ल्याजवळ आग
शुक्रवारी आंबागड किल्ल्याला आग लागल्यची वार्ता पसरली. किल्ल्याजवळ काही मजुरांनी आग लावली होती. ही आग किल्ल्याच्या पायथ्याशी लागली होती. तेंदूपत्ता व मोहफूल गोळा करण्याकरिता ही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. नंतर मजुरांनीच ही आग विझविल्याची माहिती आहे. ऐतिहासिक गड किल्ल्याजवळ आगीच्या घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.