आयसीयू कक्षासमोरील ‘एसी’ला आग
By Admin | Updated: February 28, 2017 00:23 IST2017-02-28T00:23:25+5:302017-02-28T00:23:25+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) समोरील कक्षातील एसीला आग लागली.

आयसीयू कक्षासमोरील ‘एसी’ला आग
जिल्हा रुग्णालयातील घटना : शॉटसर्किटमुळे घडला प्रकार
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) समोरील कक्षातील एसीला आग लागली. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मुन्ना नामक तरुणाच्या समयसुचकतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात थोड्या वेळासाठी धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मागे असलेल्या चवथ्या माळ्यावर इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वार्ड क्रमांक ५, ६ आयसीयु युनीट, एसएनसीयु युनीट, डायलुसिस युनीट आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास या पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयु समोरील तथा डायलुसीस कक्षाला लागून असलेल्या खोलीत एसी हे वातानुकूलीत उपकरण लागलेले आहे. या एसीला अकस्मात आग लागली. ही बाब सामान्य रुग्णालयात असलेल्या मुन्ना नामक तरुणाला कळताच त्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. क्षणभरात आगीची माहिती व धुराचा लोट रुग्णालयाच्या इमारतीत पसरला. यावेळी घटनास्थळी जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते यांच्यासह अन्य वैद्यकिय अधिकारी, तीन तंत्रज्ञ, परिचारीका व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोठा अनर्थ टळला
आयसीयु कक्षासमोर डायलुसीस युनीट तथा नवजात बालकांसाठी युनीट आहे. ज्या कक्षातील वातानुकूलीत यंत्राला (एसी) आग लागली त्या कक्षालगतच डावीकडे एसएनसीयू युनीट तर उजव्या बाजूला डायलूसीस युनीट आहे. शार्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असले तरी या आगीवर त्वरित नियंत्रण मिळाले नसते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.
ज्या कक्षात आग लागली त्याची मी स्वत: पाहणी केली. तीन तंत्रज्ञांच्या उपस्थितीत जळालेली एसी बाजूला काढण्यात आली आहे. परिस्थितीवर वेळेवर नियंत्रण करता आले.
-डॉ. रवीशेखर धकाते,
जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा