वाहन न दाखवताच मिळवा ‘पीयूसी’

By Admin | Updated: January 24, 2015 00:16 IST2015-01-24T00:16:44+5:302015-01-24T00:16:44+5:30

राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरातून दररोज हजारो वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणविरहित असल्याचे प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत ...

Find Out Without Push 'PUC' | वाहन न दाखवताच मिळवा ‘पीयूसी’

वाहन न दाखवताच मिळवा ‘पीयूसी’

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरातून दररोज हजारो वाहने धावतात. ही वाहने प्रदूषणविरहित असल्याचे प्रमाणपत्र उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या पीयूसी (पोलूशन अंडर कंट्रोल सार्टीफिकेट) केंद्रांकडून देण्यात येते. मात्र, पीयूसी देतानाचे निकष धाब्यावर बसवून वाहनाचे क्रमांक सांगा आणि पीयूसी घेऊन जा असा प्रकार सर्रास सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्या वाहनाचा क्रमांक सांगून पीयूसी मिळविल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आले आहे.
या पाहणीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताही अंकुश नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. ‘लोकमत चमू’ने शहरातील विविध कार्यालयात भंगारात पडून असलेल्या वाहनांची पीयूसी या केंद्रांकडून केवळ वाहनाचे क्रमांक सांगून सहजरित्या मिळविले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भंडारा शहरात चार प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र अधिकृतरीत्या सुरू आहेत. ग्रामिण भागात असे केंद्र नसून फिरते केंद्रही नाहीत. यापैकी सर्वच पीयूसी केंद्रांवर वाहनांची धूर तपासणी न करताच पीयूसी देण्यात येत आहे.
परिणामी भंडारा शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. वाहनांची स्थिती आणि ते प्रदूषणविरहित आहे का? याची शहानिशा न करताच पीयूसी दिली जात असल्यामुळे भंडारावासीयांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १० वर्षांपासून बंदस्थितीत धूळ खात पडलेल्या या वाहनाचा क्रमांक सांगून ‘लोकमत चमू’ ने पीयूसी प्रमाणपत्र मिळविले. (लोकमत चमू)
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ : १.११ वाजता
जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे या कार्यालयात आल्यानंतर त्यांच्या एम.एच.३६/ के.२२२२ या कारचे छायाचित्र ‘लोकमत चमू’ने टिपले. आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या पीयूसी केंद्रावर सदर प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची पीयूसी काढण्यासाठी गेले. तेथील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असे विचारले असता बाजारात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वाहन क्रमांक आणि प्रकार विचारला असता दुचाकी वाहन असल्याचे सांगीतले.तेथील कर्मचाऱ्याने ३५ रुपये आकारुन प्रमाणपत्र दिले.
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ : १.१० वाजता
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बंद स्थितीतील धूळ खात कार एम.एच. ३५ -डी. १००० या वाहनाचे छायाचित्र. त्याच पीयूसी केंद्रावर त्या बंद वाहनाची पीयूसी काढण्यासाठी सदर प्रतिनिधी गेले. तेथील कर्मचाऱ्याने वाहन कुठे आहे, असे विचारुन वाहनाचे नाव आणि क्रमांक विचारले. वाहन चौकात आहे, असे सांगितल्यानंतर ११० रूपये लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर ११० रुपये आकारुन पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.
स्थळ : पोलीस मुख्यालय
वेळ : १.३० वाजता
भंगार स्थितीतील वाहनांमध्ये रॉकेल सर्रासपणे टाकून वाहन चालविण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. अशा वाहनांवरही पीयूसी प्रमाणपत्र दिसून येते. लोकमत प्रतिनिधीने पोलीस मुख्यालयात धूळ खात पडलेल्या भंगार वाहनाचा क्रमांक सांगितल्यानंतर तेथील पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्याने कोणतीही विचारपूस व वाहनही न बघता पैसे घऊ’बिनबोभाट पीयूसी प्रमाणपत्र प्रतिनिधीला दिले.

Web Title: Find Out Without Push 'PUC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.