अखेर डाव्या कालव्यात सोडले पाणी
By Admin | Updated: July 18, 2016 01:28 IST2016-07-18T01:28:18+5:302016-07-18T01:28:18+5:30
जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही.

अखेर डाव्या कालव्यात सोडले पाणी
पंचभाई यांच्या प्रयत्नांना यश : बळीराजा सुखावला, धडाक्यात रोवणी सुरु
चिचाळ : जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही. मात्र पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी डावा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी रेटून धरली होती. शासनाने याची दखल घेवून डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने कालव्या शेजारील शेतकऱ्यांची धडाक्यात रोवणी सुरु आहेत.
पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ९० हजार हेक्टर शेती जमीनीला सिंचनाची सोय असणाऱ्या गोसे खुर्द धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, लाखनी व भंडारा तालुक्यातील एकूण २८७ गावांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टर शेत जमिनीला सिंचन होणार आहे.
गोसे खुर्द प्रकल्पाचा पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याची क्षमता असलेल्या मुख्य डाव्या कालव्याचे काम विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प एआयपीची अंतर्गत मुख्य विमोचन धरणाचे साक्र. ८२० मिटरवरुन सुरु आहे. कालव्याची एकूण लांबी २२.९३ किमी कालवा विसर्ग ४५.२२ घ.मी. सेकंद कालव्याचा तळ रुंदी १४०८८ मी. मुक्तांतर ०.९५ मी. कालव्याचा तळ उतार १.१००००, कालवाचा तळ पातळी २३८.०० एकुण सिंचन क्षेत्र (प्रवाह उपसा) ३०,४५५ ला लाभ घेता येणार आहे.
प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा चिचाळ आकोट, कोंढा, सेंद्री, सोमनाळा, भावड, ब्रम्ही, रनेळा, आसगाव, आदी गावातून गेला आहे. सदर परिसरातील काळी कसदार जमीन चौरास म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, कांदा, हरबरा, मुंग, उळीद ज्वारी, लाख, लाखोरी, जवस आदी उत्पादन होतो. मात्र कंत्राटदाराच्या कामातील संथगतीने रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता.
या वर्षाला वरुन राजाने जिल्ह्यात उशिरा दमदार हजेरी लावली परंतू शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हाची वाढ झाली नाही. त्यामुळे आलेले पाणी व्यर्थ गेले मात्र पं.स. सदस्य यांनी जिल्हाधिकारी व पूनर्वसन विभागाला अनेकदा खेट्या मारुन शासनाला कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडल्याने डावा कालवा शेजारील बळीराजाने इंजन व मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन रोवणी धडाक्यात सुरुवात झाली आहे. (वार्ताहर)