‘त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीला अखेर स्थगिती
By Admin | Updated: October 16, 2015 01:00 IST2015-10-16T01:00:02+5:302015-10-16T01:00:02+5:30
राज्यातील कुष्ठरोग विभागातील निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मागील आठवड्यात धडकले होते.

‘त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीला अखेर स्थगिती
प्रकरण कुष्ठरोग विभागातील : पुणे येथील सहसंचालकांचे आदेश
इंद्रपाल कटकवार भंडारा
राज्यातील कुष्ठरोग विभागातील निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मागील आठवड्यात धडकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकशित करताच याची दखल घेत जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांसह राज्यातील २१७ कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाबाबत स्थगिती देण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आनंदाची पर्वणी देणारा ठरला आहे.
सर्वेक्षण करुन कुष्ठरोगी शोधून काढणाऱ्या निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश धडकल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची वेळ आली होती. राज्यातील एकूण २१७ तर भंडारा जिल्ह्यातील ८ निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. दीर्घकालीन अनुभव असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी १५ आॅक्टोंबरपासून अनुदान न मिळाल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले होते.
सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यामधील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबर २०१५ पासून कार्यमुक्त करण्यासंदर्भात सहायक संचालकांना आदेशाच्या प्रतिलिपी पाठविण्यात आलेल्या होत्या. ‘प्रोजेक्ट इम्प्लीमेंट प्लान’ अंतर्गत जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांच्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले नाही.
परिणामी जिल्ह्यातील कार्यरत कंत्राटी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांना कार्यमुक्त करुन त्या दिवसांपर्यंतचे मानधन उपलब्ध असलेल्या निधीमधून करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. याबाबत कुष्ठरोग कर्मचाऱ्यांंनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेतली. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी कर्मचाऱ्यांची समस्यांची जाणून घेत केंद्र शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीबाबतच्या आदेशावर स्थगिती आणण्याची सुचना कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकांना दिली आहे.
जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण संदर्भात कुष्ठरोग तंत्रज्ञांची नेमणुक करण्यात आलेली नाही. पर्यवेक्षण नाही. अपुर्ण भौतिक उपचार, अपूर्ण साहित्य वाटप आदी कारणांमुळे शासनाचे कुष्ठरोग निर्मुलनाचे काम अपूर्ण आहे.
मागील १५ वर्षांपासून सदर कर्मचारी कुष्ठरोगाचे प्रशिक्षण घेवून प्रामाणिकतेने कार्य करीत आहेत. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यावर भर देणे, रुग्णांवर भौतीकपचार, ड्रेसींग, औषध वाटप, जनजागृती आणि इतरही शासनाच्या आरोग्य सेवेंतर्गत निरनिराळी कामे केली जात आहेत.