अखेर बचत गटांसाठी विक्री केंद्र मंजूर
By Admin | Updated: June 13, 2016 02:14 IST2016-06-13T02:14:04+5:302016-06-13T02:14:04+5:30
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत तालुकास्तरावरील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र तयार करण्यात येणार आहे.

अखेर बचत गटांसाठी विक्री केंद्र मंजूर
बसस्थानकाजवळ होणार बांधकाम : दोन वर्षानंतर सुटला जागेचा तिढा
मोहाडी : स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत तालुकास्तरावरील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र तयार करण्यात येणार आहे. बसस्थानक मोहाडी समोरील खाली जागेत लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.
स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून वस्तू उत्पादीत केली जाते. उत्पादीत केलेली वस्तू ठराविक ठिकाणावरून विक्री व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून तालुकास्तरावर कायम स्वरुपी विक्री केंद्र बांधण्याची योजना आहे. मोहाडी येथे स्वयंसहायता बचत गटासाठी विक्री केंद्र बांधण्यासाठी जागेच्या मंजुरीसाठी दोन वर्षाहून अधिक प्रतिक्षा करावी लागली. जिल्हाधिकारी भंडारा, वनविभाग भंडारा, तहसीलदार मोहाडी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभाग पंचायत समितीकडून खंडविकास अधिकारी मोहाडी गजानन लांजेवार व विस्तार अधिकारी शामलाल भोयर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे वनविभाग भंडाराकडून वडेगाव / मोहाडी येथील गटक्रमांक ८६ आराजी २.९३ हे.आर. जागेपैकी ५१२.५४ चौरस मिटर क्षेत्र असलेली जागा मंजूर करण्यात आली आहे. आता बचत गटाच्या उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आाहे. विक्री केंद्र बांधकामासाठी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या टाईप प्लॅन प्रमाणे विक्री केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे. बसस्थानकाच्या बाजूला विक्री केंद्र बनणार असल्याने समोरील अतिक्रमण केलेली दुकाने बाजूला केली जाण्याची शक्यता आहे. महिलांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे बचत गटांमध्ये वस्तू उत्पादीत करण्याची स्पर्धा निर्माण होणार आहे. या विक्री केंद्रामुळे बसस्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. (तालुका प्रतिनिधी)