अखेर पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त निघाला

By Admin | Updated: November 5, 2015 00:44 IST2015-11-05T00:44:23+5:302015-11-05T00:44:23+5:30

मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस स्टेशन मंजूर होवून वर्षभराचा कालावधी लोटला.

Finally, the police station excavation started | अखेर पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त निघाला

अखेर पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त निघाला

करडी व वरठी पोलीस स्टेशन पालकमंत्र्यांचे हस्ते आज उद्घाटन
युवराज गोमासे करडी
मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस स्टेशन मंजूर होवून वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र विभागाला मुहूर्त सापडत नव्हता. आॅगस्ट महिन्यात विभागाने मुहूर्त शोधला, जय्यत तयारीही केली गेली. मात्र अचानक सोहळा रद्द करण्यात आला. कुठे माशी शिंकली, कुणास ठाऊक तारिख सापडता सापडेना. प्रजासत्ताक दिनी उद्घाटन होणार याचा अंदाज सर्वांना असताना एकाएक विभागाने दिवाळीच्या अगोदरच मुहूर्त काढून नागरिकांना एकप्रकारे धक्काच दिला असून ५ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री दिपक सावंत यांचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
करडी व वरठी पोलीस स्टेशनची मागणी सन १९६२ पासून वेतन होती. मात्र प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून स्टेशनच्या मार्गात प्रशासनाकडून अडथळे आणले गेले.
वरिष्ठ लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नेहमी नागरिकांकडून केला जायचा. माजी आ. अनिल बावनकर यांनी प्रकरणी लक्ष घातले आणि एकाचवेळी मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस स्टेशनला मंजुरी मिळविली. माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांचे धोरण व कणखर पाठींबा त्यासाठी कारणीभूत ठरला.
सन २०१४ च्या सुरूवातीला दोन्ही पोलीस स्टेशनला मंजूरी मिळाली. कामकाजाच्या दृष्टीने अनेक बदल घडवून आणण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. काही प्रमाणात भौतिक सुविधाही उभारल्या गेल्या. मात्र वर्ष लोटूनही उद्घाटनाचा मुहूर्त प्रशासनाला सापडता सापडेना. नागरिकांची अपेक्षापूर्ती केव्हा होणार, हा प्रश्न लोकमतने जनतेच्या दरबारात अनेकदा मांडला. मात्र प्रत्येकवेळी काहीना काही कारणे प्रशासनाकडून सांगितली जात होती. राजकीय मंडळीतही असंमजसपणा प्रकरणी दिसून येत होता.
यासर्व भानगडीत उद्घाटनाचा मुहूर्त लांबत गेला. आॅगस्ट महिन्यात उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याचे पोलीस विभागाचे वतीने कळविण्यात आले होते. विभागामार्फत निमंत्रण पत्रिका काढून संबंधितांना वाटपही करण्यात आले होते. मात्र काय झाले, कुणास ठाऊक, उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. पुढील तारिख निघण्यास तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लोटला. २६ जानेवारी रोजी उद्घाटन पार पडणार असा संकेत नागरिकांत होता. मात्र हा कयास फोल ठरवित पोलीस विभागाने दिवाळीच्या ऐन तोंडावर उद्घाटनाचा सोहळा घेतला. ५ नोव्हेंबर रोजी उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यात आलेला असून नियंत्रण पत्रिकाही वाटप करण्यात आली आहे.
वरठी येथे दुपारी ३ वाजता तर करडी येथे ३.४५ वाजताच्या उद्घाटनाचा मुहूर्त असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी खा. नाना पटोले, आ. चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे, आ. बाळा काशिवार, जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी धिरजकुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील, असे पोलीस अधिक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी एम.एफ. शेंडे यांनी कळविले आहे.

Web Title: Finally, the police station excavation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.