अखेर बांधकाम स्थगितीचे आदेश!
By Admin | Updated: December 13, 2014 00:59 IST2014-12-13T00:59:35+5:302014-12-13T00:59:35+5:30
येथील गढकुंभली मार्गावर सुरू असलेले तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे व जुन्याच ठिकाणी तहसील कार्यालय बांधण्यात यावे, ...

अखेर बांधकाम स्थगितीचे आदेश!
साकोली : येथील गढकुंभली मार्गावर सुरू असलेले तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे व जुन्याच ठिकाणी तहसील कार्यालय बांधण्यात यावे, यासाठी साकोली येथे चार दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या प्रकरणावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी संबंधित कामाला स्थगिती देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले असले तरी हे आदेश साकोलीच्या तहसीलदारांपर्यंत पोहचलेले नाही. या आशयाचा शेरा ना.खडसे यांनी निवेदनात नमूद केला असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे.
साकोली तहसील कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व गडकुंभली मार्गावर सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे यासाठी साकोली येथे दि.९ रोजी साकोली बंद व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने याची दखल न घेतल्याने या धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत साखळी उपोषणात करण्यात आले. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, शिवकुमार गणवीर, कैलास गेडाम, हेमंत भारद्वाज, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मार्कंड भेंडारकर हे नागपूर येथे अधिवेशनात गेले व त्यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन याप्रकरणाची कैफीयत मांडली व या प्रकरणाची आवश्यक कागदपत्रे देऊन निवेदन दिले. निवेदनानुसार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेरा मारून जिल्हाधिकारी भंडारा यांना स्थगीती देण्यात यावी, असे निर्देश दिले. याची माहिती आंदोलकांना मिळताच साखळी उपोषण रद्द करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशांच्या गजरात शहरातून रॅली काढण्यात आली. यासंदर्भात दि. १५ रोजी मंडपस्थळी बैठक घेण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)