अखेर भिमलकसा प्रकल्पाला मिळाली अंतिम मान्यता

By Admin | Updated: August 12, 2015 00:30 IST2015-08-12T00:30:06+5:302015-08-12T00:30:06+5:30

वडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाला अखेर अंतिम मान्यता मिळाल्यामुळे मागील ४० वर्षापासून बंद असलेल्या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे.

Finally Bhimlakka project got final approval | अखेर भिमलकसा प्रकल्पाला मिळाली अंतिम मान्यता

अखेर भिमलकसा प्रकल्पाला मिळाली अंतिम मान्यता

९३१ हेक्टरचे होणार सिंचन : ४० वर्षानंतर सुरू होणार काम
संजय साठवणे साकोली
वडेगाव येथील जंगलाला लागून असलेल्या भिमलकसा प्रकल्पाला अखेर अंतिम मान्यता मिळाल्यामुळे मागील ४० वर्षापासून बंद असलेल्या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला सिंचनाची सोय होवनू हरीतक्रांती घडेल. हा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून वनकायदा व शासनाची परवानगी यात रखडलेला होता. आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला व या प्रकल्पाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली आहे.
भिमलकसा लघु प्रकल्पाला ८ मे १९७३ अन्वये २४.९० लाख रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर याप्रकल्पाचे काम जानेवारी १९७५ मध्ये रोजगार हमी योजनेतून सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ९३१ हेक्टर असून त्यावेळी या धरणाचे मातीकाम घळभरणी वगळता पुर्ण करण्यात आले होते. या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पुर्ण झाल्यानंतर १८ मे १९८६ ला वनकायदा अस्तित्वात आला व या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते. तेव्हापासून या प्रकल्पाकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. कालांतराने हा प्रकल्प तसाच पडून राहिला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २००८-०९ ला या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका झाली. त्यानंतर काम थंडबस्त्यात राहिले. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बरेचदा लोकप्रतिनिधीची भेट घेतली. एकदा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र त्याचा फायदा झाला नाही. वनकायद्यातून सुटका झाली तेव्हा वनजमिनीचे मालमत्ता मुख्य ११२९.५८८ लाख वनविभागास भरावयाची होते व कामाची किंमत १५१७.५५७ लाख असे एकूण २६४७.१४५ लाख रूपये शासनास मंजुर करावयाचे होते. मात्र तेव्हापासून ही फाईल कासवगतीने वनमंत्रालयात जमा होती. अखेर आ. बाळा काशीवार यांनी या प्रकल्पाला मार्गी लावण्याचा निर्धार केला.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घातले. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली.

असा आहे आदेश
भिमलकसा लघु प्रकल्पातील ११६.०३ हेक्टर वनजमीन वळती करण्याच्या प्रस्तावात वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी अंतिम मान्यता प्रदान केली असून सदर प्रकलपातील झाडे कटाईकरिता मागणी करण्यात आलेल्या रकमेचा भरणा ४६.१० लक्ष मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया यांनी दि.२७ फेब्रुवारी २०१३ ला वनविभाग भंडारा यांना प्रदान करण्यात आले होते.
या गावातील शेतीला होणार सिंचनाचा लाभ
सदर प्रकल्प पुर्ण झाल्यास जमनापुर २३२ हेक्टर, पाथरी ९५ हेक्टर, वडेगाव १४४ हेक्टर, खांबा ३०१ हेक्टर तुडमापुरी १५९ हेक्टर असे एकूण ९३१ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.

साकोली तालुक्यात तीन मोठे प्रकल्प असून निम्न चुलबंद प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. भीमलकसा प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाल्याने लवकर हा प्रकल्प पुर्ण होईल. त्यानंतर घानोड येथील भुरेजंगी प्रकल्पाच्या कामासंदर्भात प्रयत्न करणार आहे.
- बाळा काशिवार,
आमदार साकोली

Web Title: Finally Bhimlakka project got final approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.