'भीमलकसा'ला अंतिम मान्यता
By Admin | Updated: February 24, 2017 00:38 IST2017-02-24T00:38:16+5:302017-02-24T00:38:16+5:30
तालुक्यातील भिमलकसा लघू पाटबंधारे प्रकल्पाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला अखेर अंतिम मान्यता मिळाली.

'भीमलकसा'ला अंतिम मान्यता
प्रतीक्षा संपली : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नांना यश
साकोली : तालुक्यातील भिमलकसा लघू पाटबंधारे प्रकल्पाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला अखेर अंतिम मान्यता मिळाली. यासाठी आमदार यांचे प्रयत्न फळाला लागले आहे.
२५ वर्षापासून रखडलेल्या भिमलकसा लघु पाटबंधारे प्रकल्प, साकोलीच्या बांधकामाकरीता ११६.०३ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा प्रस्ताव सन १९९८ मध्ये सादर केला होता. तेव्हा राज्यशासनाने सन २००० मध्ये वन संवर्धन अधिनियम, १९८० च्या कलम २ अन्वये सदर वनक्षेत्र वळती करण्याची भारत सरकारला शिफारस केली होती. तेव्हा भारत सरकारने २६ नोव्हेंबर २००८ च्या पत्रात नमुद केलेल्या अटींची पुर्तता करण्याचा अधीन राहून मान्यता प्रदान केली. त्यानंतर राज्यशासन व केंद्रस्थ अधिकारी, नागपूर यांनी त्यांच्या ९ जून २०१५ च्या पत्रान्वये अटी पुर्तता अहवाल भारत सरकार यांना सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने भारत सरकार यांच्या १७ जुलै २०१५ च्या पत्रान्वये जमीन वळतीकरणाची अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. परंतु अंतिम मान्यता पत्रातील नमुद अटीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर केंद्रशासनाने अटीमध्ये सुधारणा करून सुधारित अंतिम मान्यतेचे आदेश काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)