शेतीच्या मशागतीसाठी यंत्रांच्या वापरावर भर
By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:32:04+5:302016-06-07T07:32:04+5:30
पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी राहत होती. बैलजोडी म्हणजे शेतकऱ्यांची प्रतिष्ठा होती.

शेतीच्या मशागतीसाठी यंत्रांच्या वापरावर भर
खरीप हंगाम : बळीराजा लागला कामाला, बैलाऐवजी ट्रॅक्टरचा वापर
जवाहरनगर : पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी राहत होती. बैलजोडी म्हणजे शेतकऱ्यांची प्रतिष्ठा होती. त्यावेळी बैलाद्वारे शेती करावी लागत असे; पण आज महागाईच्या काळात शेतीची मशागत आधुनिक यंत्रांच्या साह्याने होत आहे. यात नांगरणी, वखरणी, डवरणी, फवारणी व पेरणी आदी कामे ट्रॅक्टरच्या साह्याने होत आहे. सध्या शेतीची मशागत सुरू असून ती कामेही यंत्रांच्या साह्यानेच केली जात असल्याचे दिसते.
पूर्वीच्या तुलनेत आज बैलजोडी लाखो रूपयांची घ्यावी लागते. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने करण्यावर भर दिला आहे. परिसरातील उन्हाळी मशागत अंतिम टप्प्यात आली असून कुठे खरीपाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. बैलाला हजारो रूपयांचे वैरण, त्याची देखभाल व मजुरी असा खर्च असतो. काळानुरूप ही मशागत करणे न परवडणारी ठरत आहे. यातूनच किफायतशीर व कमी वेळात ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीने चांगलाच जोर धरला आहे. नवनवीन शेती अवजारे उपलब्ध झाल्याने नांगरणी, वखरणी, पेरणी, रोटावेटरद्वारे शेतीची कामे कमी वेळ व पैशात होत आहे. मिनीट्रॅक्टरही बाजारात आले. अल्प खर्चात मशागत होते. तंत्रज्ञानामुळे शेती हायटेक होत आहे. बैलाचे वाढते भाव व दुष्काळी स्थिती यावर मात करीत शेतकरी यंत्राच्या साह्याने शेती करताना दिसतो. (वार्ताहर)