बोगस मजुरांच्या नावे रकमेची अफरातफर

By Admin | Updated: February 18, 2015 00:24 IST2015-02-18T00:24:39+5:302015-02-18T00:24:39+5:30

सामाजिक वनिकरण विभाग भंडारा अंतर्गत तुमसर परिसरात कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.

Filing of bogus laborers | बोगस मजुरांच्या नावे रकमेची अफरातफर

बोगस मजुरांच्या नावे रकमेची अफरातफर

तुमसर : सामाजिक वनिकरण विभाग भंडारा अंतर्गत तुमसर परिसरात कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. एका मजूराला संरक्षण कामाची मजूरी न देता दुसऱ्या मजुराच्या नावावर मजूरी काढून रकमेची उचल करुन अफरातफर करण्यात आली. या प्रकरणी तक्रार मुख्य वनसंरक्षक तथा सामाजिक वनीकरणाचे उप महासंचालकांना करण्यात आली. या प्रकरणात साक्षी पुराव्यानंतरही कारवाई झालेली नाही.
रोपवन संरक्षण मंजूर जयदेव हरीराम जांभूळपाने रा. आंबागड यांनी दिलेल्या तक्रारीत तुमसर परिक्षेत्रातील कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १३ अंतर २ किमी मधील कामावर खड्डे खोदण्यापासून ते संरक्षण कामे केली. या कामाची मजूरी मिळाली नाही. उलट संरक्षण कामावर लक्ष्मण पुनाजी चौधरी, सुरेश कुंवरलाल चौधरी, हिवराज कुंवरलाल चौधरी, गणेश बाळकृष्ण राहांगडाले सर्व रा. दावेझरी या मजूरांना आंबागड ते बपेरा रोपवनावर संरक्षण कामावर दाखवून खोटे व्हाऊचर तयार करण्यात आले. या कामाची मजूरी १ लक्ष ५ हजार १८० रकमेची उचल करुन अफरातफर केली आहे. आंंबागड ते बपेरा रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १३ मधील रोपवनावर २ किमी अंतरावर एक हजार रोपाकरिता संरक्षण कामावर केवळ एका मजूराची तरतुद आहे. संरक्षण कामावर नियमित असलेले मजूर जयदेव जांभूळपाने यांना मजूरीचे रक्कम सुपारे ८० ते ९० हजार मिळाली नाही. जांभूळपाने यांचा प्रति दिवस २८४ रुपये मजूरी देण्याचे ठरले होते. संरक्षणाची जबाबदारी ३ सप्टेंबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत जांभूळपाने यांनी सांभाळली. १ एप्रिल २०१४ पासून संरक्षण कामावर कुणीही नाही. शासनाच्या नियमानुसार संरक्षणाचा कार्यकाळ २०१६ पर्यंत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे तुमसर परिक्षेत्रातील लागवड अधिकारी डी. जी. चौधरी आहेत. चार बोगस मजूरांचे बयान घेऊन पंचासमोर त्यांनी कामे केली नाही असे बयान देऊन स्वाक्षरी केली. चुकीची माहिती तयार करुन पैशाची उचल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. आंबागडचे उपसरपंच प्रमोद कटरे, प्रेस चौधरी व दावेझरीचे पोलिस पाटील जयदेव राहांगडाले हे पंच म्हणून उपस्थित होते.
या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक एन. डब्ल्यू. कावळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंरतु सहाय्यक संचालक कावळे चौकशी करीता आले नाही. यासंदर्भात जांभूळपाने यांनी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक कावळे यांचेशी संपर्क केला तेव्हा संचालक श्रीखंडे यांनी बयान घेण्याकरिता जाऊ नका असे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Filing of bogus laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.