वाढीव दर व लिंकिंगसह केला खताचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:25+5:302021-07-20T04:24:25+5:30
भंडारा : शासनाच्या आदेशानंतरही रासायनिक खत कंपनीने वाढीव दर व लिंकिंगसहित पुन्हा एकदा खताचा पुरवठा केला आहे. शासकीय आदेशाची ...

वाढीव दर व लिंकिंगसह केला खताचा पुरवठा
भंडारा : शासनाच्या आदेशानंतरही रासायनिक खत कंपनीने वाढीव दर व लिंकिंगसहित पुन्हा एकदा खताचा पुरवठा केला आहे. शासकीय आदेशाची पायमल्ली करून बळीराजाची आर्थिक लूट करणाऱ्याला कृषी विभागाची मूक संमती आहे का, असा प्रश्न बळीराजा विचारत आहेत. विशेष म्हणजे आधीपेक्षा दर १२५ रुपयांनी महागले आहेत.
रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून लिंकिंग खते घेण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशनेही दुजोरा दिला होता. या संदर्भात खुद्द ॲग्रो डीलर असोसिएशनने कृषी विभागाला निवेदन देत खतपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसवावा, अशी मागणीही केली होती. असे असतानाच कोरोमंडल या कंपनीने आदेशाची पायमल्ली करीत राजरोसपणे पन्नास रुपयांची दरवाढ करून लिंकिंगसह खताचा पुरवठा कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे दिला आहे. आधी शासनाने याचे दर १०५० रुपये ठरवून दिले आहे. कंपनीने स्वत:हून केलेल्या दरवाढीमुळे कृषी केंद्र संचालकांना बळीराजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बळीराजाचा रोष व दुसरीकडे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे कोरोमंडलने ‘सल्फामॅक्स’ खताची लिंकिंग करून ११२५ या दरात ५० रुपयांची वाढ करून खतपुरवठा केला आहे. खतपुरवठा करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींची कृषी विभागाशी साटेलोटेेेे असल्याची खमंग चर्चा आहे. दुसरीकडे खत कंपनी असलेल्या इफ्कोने दिलेला शब्द पाळला आहे. या कंपनीने ९७५ या जुन्याच दरानेेे खत उपलब्ध करून दिले आहे.
बॉक्स
कृषी आयुक्तांनी लक्ष द्यावे
खत कंपन्यांनी प्रत्येक गोणीमागे दरवाढ करून शासकीय आदेशाची पायमल्ली केली जात आहे. विशेषतः कंपनी प्रतिनिधीची अरेरावी वाढल्याचे कृषी केंद्र संचालक सांगत आहेत. कृषी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली होत असताना जिल्हा कृषी विभाग गप्प का, असा प्रतिप्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे. या सर्व प्रकरणाची कृषी आयुक्तांमार्फत चौकशी करावी व वाढीव दराने विक्री होत असलेली खतांची दरवाढ मागेे घ्यावी, अशी बळीराजाची एकमुखी मागणी आहे.