खत, बियाणे बिघडविणार बजेट
By Admin | Updated: May 11, 2014 00:06 IST2014-05-11T00:06:20+5:302014-05-11T00:06:20+5:30
अतिवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे.

खत, बियाणे बिघडविणार बजेट
भंडारा : अतिवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे. यंदा खत व बियाण्यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल मिळणार्या सोयाबीन बियाण्याच्या किंमती ७ हजार ९५० रुपयांवर पोहोचल्या आहेत तसेच धानाच्या किमती ४ हजार ५०० रुपयांवरुन ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्यांच्या किमती ९ हजार ५०० रुपयांवरुन १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकर्याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात सरासरी १४ लाख ९९ हजारर ३२ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यासाठी सुमारे ४ लाख ४६ हजार १२३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी महाबीज महामंडळाकडून १ लाख ९२ हजार १२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाला साधारण एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. मात्र बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केली आहे. खत बियाण्यांच्या दुकानातील गर्दी वाढू लागली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकुर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे योग्य सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून बियाण्याच्या किंमतीतत ही भाववाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. (नगर प्रतिनिधी) सोयाबीन बियाण्यांवर अनुदान हवे गतवर्षीपर्यंत महाबीजच्या सोयाबीन बियाण्यावर राज्य सरकारकडून प्रति क्विंटलमागे ५०० रुपयाचे अनुदान दिले जात होते. त्याचा शेतकर्यांना फार मोठा फायदा मिळत होता. परंतु अलिकडे राज्य सरकारने ते अनुुदान बंद केले आहे. यंदा सोयाबीन बियाण्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पाच ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार्या या बियाण्याच्या किंमती आठ हजार रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. एवढ्या महाग बियाण्याच्या खरेदी करणे विदर्भातील शेतकर्यांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंदा पुन्हा महाबीज सोयाबीन बियाण्यावरील अनुदान जाहीर करावे अशी शेतकर्यांकडून मागणी पुढे येत आहे.