सुपीक मातीचे खणन
By Admin | Updated: May 20, 2015 01:20 IST2015-05-20T01:20:30+5:302015-05-20T01:20:30+5:30
जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे.

सुपीक मातीचे खणन
भंडारा : जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदी पात्राजवळच्या स्मशानभुमी परिसरातील सुपीक मातीची वाहतुक केली जात आहे. रेतीची अवैध वाहतुकीनंतर या मातीची खुलेआम तस्करीवर तस्कारांची नजर गेली आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला सुपीक भुभाग लाभला आहे. जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या भरोश्यावर बारमाही पिकेही घेतली जातात. वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्याला १२० किलोमीटरचा वळसा घालुन वाहते.
त्यामुळे या नदीपात्रात वाळूच्या रूपाने अमुल्य देणगी या जिल्ह्याला मिळाली आहे.
तेवढीच सुपीक जमीनही नदीकाठावर आहे. परिणामी प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या व शासकीय मालमत्ता असलेल्या या जमीनीवरील मातीचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे.
नदी काठावरील हिंदु स्मशानभूमी ते पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटर परिसरातून तस्करांनी मातीचे खणन करायला सुरूवात केली आहे. यासाठी नदीकाठावर जाण्यासाठी कच्चा रस्ताही तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्टर थेट नदीकाठापर्यंत नेण्यात येते.
मजुरांच्या साह्याने नदीकाठावरील सुपीक मातीचे खणन करून ट्रॅक्टर टालीत भरण्यात येते. पहाटेपासुनच या कामला सुरूवात होते. तालुका महसुल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. ही माती घरबांधकामासाठी अथवा एखादे ले-आऊट समतल करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती आहे. फुकटच्या सुपीक मातीवर कुणाची तरी वाईट नजर गेली आहे. (प्रतिनिधी)