शिक्षकांचा अशैक्षणिक फेरफटक्यावर कुंपण
By Admin | Updated: September 22, 2014 23:15 IST2014-09-22T23:15:09+5:302014-09-22T23:15:09+5:30
कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक

शिक्षकांचा अशैक्षणिक फेरफटक्यावर कुंपण
शिक्षकांची नेतागिरी अडचणीत : अध्यापन सोडून भटकणे बंद
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक काम करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यात बहुतांश संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जास्त प्रमाणात समावेश असतो. आता मात्र अध्यापनाचे काम सोडून शाळेच्या वेळेत भटकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी एक अल्टिमेटमच जारी केला असून कोणत्याही कामासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायचे असेल तर रजा काढूनच यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ‘नेतागिरी’ करणाऱ्या शिक्षकांवर चांगलाच आळा बसणार आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करताना विचार करतात. विशेष म्हणजे, काही शिक्षकांनाच स्वत:च्या शाळेविषयी ‘भरोसा’ नाही. यात काही शाळा आणि शिक्षक अपवाद आहे. ढासळलेली विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्ववत आणण्यासाठी शासकीय स्तरापासून तर, प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्व जण कामाला लागले आहे. मात्र आजही काही शिक्षक पाहिजे तसे सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाही. शाळेमधून सुटी न घेताच शैक्षणिक काम असल्याचा आव दाखवून शाळा सुरु असलेल्या वेळेत वैयक्तिक कामावर शिक्षक भर देतात. अनेकवेळा इतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा गावात इतरत्र फिरतात. शिक्षक सुटीवर असल्याने विद्यार्थीही वाट्टेल तिथे फिरतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त यावी यासाठी प्रथम बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांनी अलिकडेच शिक्षकांना शाळेच्या वेळत रजा न घेता फिरताना दिसल्यास कारवाई करण्याच्या आदेश दिला आहे.
एवढेच नाही तर, त्यांनी शिक्षकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी पत्राद्वारे कळवावे. शाळा सुरु होण्यापूर्वी किंवा बंद झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे, असेही सांगितले आहे. शिक्षकांना आपल्या वैयक्तिक कामासाठी शाळेच्या वेळेत येता येणार नाही. यायचे असेल तर रजा काढूनच यावे असेही म्हटले आहे. यामुळे काही शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र त्यांच्या या आदेशाचे बहुतांश शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले आहे.