सायकलपटू सुशिकलाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
By Admin | Updated: February 26, 2017 00:28 IST2017-02-26T00:28:35+5:302017-02-26T00:28:35+5:30
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलींग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील निलज करडी येथील खेळाडूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

सायकलपटू सुशिकलाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली अजिंक्य : आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याला मिळवून दिला लौकिक
भंडारा : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलींग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील निलज करडी येथील खेळाडूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. या अलौकिक कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होत्या. याप्रसंगी तिचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यामध्ये पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा प्रबोधिनीमध्ये सुशिकला आगाशेची सन २०११-१२ मध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली. क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथे तिला सरावासाठी प्रवेश देण्यात आला. सायकलींग या खेळामध्ये असलेली सुशिकलाची कामगिरी व प्राविण्य पाहून तिचे पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पाठविण्यात आले. या क्रीडा प्रकारातील तिच्या कौशल्याचा सराव महाराष्ट्र शासनाच्यावतीने करून घेण्यात आला. या विशेष प्रशिक्षणाच्या बळावर सन २०१४ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक पटकाविले होते.
सुशिकला आगाशे या विद्यार्थिनीच्या प्राविण्याची दखल घेऊन भारतीय खेळ प्राधिकरणाने तिची निवड भारतीय संघामध्ये करुन तिला अडव्हांस ट्रेनिंग देण्यात आली. सुशिकलाने आपल्या परिश्रमाच्या बळावर भारताला कास्य पदक मिळवून दिले.
जिल्ह्याचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर केला. तिच्याच पावलावर पाऊल टाकून भंडारा येथील खेळाडू अश्विन पाटील, मयुरी लुटे, वैष्णवी गभणे, क्रीडा नैपुण्य चाचण्या व क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र शासनामार्फत भारतीय क्रीडा प्राधिकरण दिल्ली येथे भारतीय संघामध्ये निवड होऊन सरावाकरिता आहेत.
या सर्व खेळाडूंचे क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोले, संदिप खोब्रागडे, मनोज पंधराम , क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, रविंद्र वाळके यांनी अभिनंदन केले. (नगर प्रतिनिधी)