ढिवरखेड्यात तापाची साथ
By Admin | Updated: September 13, 2015 00:27 IST2015-09-13T00:27:13+5:302015-09-13T00:27:13+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील ढिवरखेड्यात तापाची साथ उसळली असून प्रत्येक घरात तीन ते चार तापाचे रुग्ण आहेत.

ढिवरखेड्यात तापाची साथ
घरोघरी रुग्ण : रुग्णालयात गर्दी, सरपंचांनी केली शिबिराची मागणी
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील ढिवरखेड्यात तापाची साथ उसळली असून प्रत्येक घरात तीन ते चार तापाचे रुग्ण आहेत. येथील सरपंच गजानन शिवणकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावात शिबिराची मागणी केली आहे.
तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, दुखणे आदींच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वातावरणातील बदलाने व स्वच्छतेच्या अभावाने रुग्णसंख्येत बेसुमार वाढत आहे. मागील तीन वर्षापूर्वी याच गावातील तेजराम शिवणकर, भाऊराव मटाले, रेखा थेर, नत्थु हत्तीमारे यांचा साथीच्या आजारानेच मृत्यू झाला होता.
गावातील आरोग्य बिघडल्याने जनता भयभीत वृत्तीने वावरत आहे. सदर प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता स्वच्छतेचा अभाव जाणवला. पशुपालनामुळे प्रत्येकाचे घरी मलमुत्राची निट व्यवस्था नाही. वस्तीशेजारीच रस्त्याच्या दुतर्फा गावकरी शौचास जातात. यामुळे साथीचे आजार बळावतात. प्रत्येक घरामध्ये किमान तीन रुग्ण असल्याने घरातील व्यक्तीला त्यांची सुश्रूशा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्याने गावातील नागरिकांवर औषधोपचार करता यावा याकरिता आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर लावावे अशी मागणी सरपंच शिवणकर यांनी केली आहे.(वार्ताहर)