'तो' दोषपूर्ण रस्ता मृत्युमार्ग ठरणार !
By Admin | Updated: May 14, 2015 00:25 IST2015-05-14T00:25:07+5:302015-05-14T00:25:07+5:30
राज्य शासनाने देव्हाडी-माडगी मार्गावरील पूल बांधण्याकरिता मोजकाच निधी मंजूर केल्याने बायपास रस्त्याला कात्री लावण्यात ...

'तो' दोषपूर्ण रस्ता मृत्युमार्ग ठरणार !
बायपासकरिता निधी नाही : देव्हाडी-माडगी मार्गावरील पुलाची उंची केव्हा वाढणार?
मोहन भोयर तुमसर
राज्य शासनाने देव्हाडी-माडगी मार्गावरील पूल बांधण्याकरिता मोजकाच निधी मंजूर केल्याने बायपास रस्त्याला कात्री लावण्यात आली. या मार्गावर सध्या जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार मार्गक्रमण करीत आहेत.
केवळ ५० फुटावर बावनथडी प्रकल्प वितरिकेचे पुल उंच तयार केल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरला आहे. दोषपूर्ण बांधकामासंदर्भात तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग मृत्यूमार्ग ठरण्याची शक्यता आहे.
पुलाच्या बांधकामाकरिता निधी मिळावा याकरिता विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे रस्ता वर्ग करण्यात आला. १९ लक्ष ७३ हजाराचा निधी मंजूर झाला. २५ टक्के बिलो मध्ये रस्ता बांधकामाचे काम कंत्राटदाराने घेतले. निधीच्या कमतरतेमुळे बायपास रस्त्याला कात्री लावण्यात आली. कच्चा रस्ता येथे तयार करण्यात आला. पायदळ व सायकलस्वाराकरिता हा रस्ता आहे. परंतु दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून येथून प्रवास करतात.
५० फुटावर बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे पुल येथे तयार करण्यात आले. हा पुल अतिशय उंच आहे. निर्माणाधिन पुल खाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उंची वाढविली तर ३२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने तक्रार केली. परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या उंचवट्यामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. जिल्हा परिषदेकडून २०१३ मध्ये हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला. २० वर्षानी प्रमुख जिल्हा मार्ग राज्याकडे वर्ग करण्यात येतो. या रस्त्याावरील हा पुल कारखान्याने ५० वर्षापूर्वी बांधला होता. प्रकल्पाचा पुल उंच बांधला तर सार्वजनिक बांधकाम खात्याने सुद्धा पुल उंच बांधण्याची गरज होती. निधी कमी आहे म्हणून दोषपूर्ण बांधकाम करण्याची गरज नाही. केवळ मागणी आहे म्हणून कामे पार पाडण्याची गरज नव्हती. तांत्रिक त्रुट्या संदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे ही समस्या मांडण्याची गरज होती. तांत्रिक त्रुट्यांमुळे हा रस्ता अपघातग्रस्त ठरण्याची भीती आहे.
बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना उंच पुलाबद्दल तक्रार करण्यात आली. निधीअभावी बायपास रस्ता तयार करण्यात आला नाही. केवळ सायकल व पायदळ वाहतूक सुरु आहे. जबरदस्तीने दुचाकीस्वार प्रवास करतात. पुलाच्या बांधकामासंदर्भात वरिष्ठांकडून आदेश प्राप्त आहे.
- बी.एम. परिहार
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर.