बैलाऐवजी टॅ्रक्टरचा पोळा
By Admin | Updated: August 27, 2014 23:17 IST2014-08-27T23:17:49+5:302014-08-27T23:17:49+5:30
शेतात राबणाऱ्या बैलांचे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावात बैल दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलच नसेल तर

बैलाऐवजी टॅ्रक्टरचा पोळा
जिल्ह्यात चर्चा : कुशारीवासीयांचा अभिनव उपक्रम
मोहाडी : शेतात राबणाऱ्या बैलांचे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावात बैल दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलच नसेल तर पोळा कसा साजरा करायचा, या विचाराने चिंतित भंडारा जिल्ह्यातील कुशारी गावातील शेतकऱ्यांनी ‘बैल नाही तर काय झाले ट्रॅक्टर तर आहे ना’ असा विचार करुन ट्रॅक्टरलाच सजवून ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कुशारी गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यासाठी प्रत्येकच शेतकऱ्यांजवळ ट्रॅक्टर आहे. ते शेतीही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. त्यामुळे या गावात ट्रॅक्टरची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत बैलच नाही तर पोळा कसा साजरा करायचा. असा प्रश्न समोर आल्यानंतर कुशारी येथील शेतकऱ्यांनी त्यावर पर्याय शोधून मंगळवारला ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला. अडीच हजार लोकवस्तीच्या कुशारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मंगळवारला सायंकाळी ५० शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सजवून पोळ्यात सहभागी झाले. त्यानंतर विधीवत पुजा करण्यात आली. ट्रॅक्टरला पुष्पहार टाकून फटाके फोडून पोळा फोडला. उत्कृष्ट ट्रॅक्टर सजावटीला बक्षिसेही देण्यात आले.
कुशारी येथील दिगांबर गभने यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टरधारक शेतकरी अरविंद भिवगडे, गौरीशंकर गायधने, विवेक दिपटे, रामू गायधने, हर्षल गभने यांच्या पुढाकाराने या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आयोजकांनी कुशारीत यापुढे दरवर्षी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात येईल, असे सांगितले.
(शहर प्रतिनिधी)