जीर्ण तलाव ठरताहेत जीवघेणे
By Admin | Updated: August 7, 2014 23:45 IST2014-08-07T23:45:56+5:302014-08-07T23:45:56+5:30
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात परिचीत असला तरी अनेक तलावाच्या पाळी जीर्ण झाल्या आहेत. सिंदपुरी तलावांची मालकी व त्यावर नियंत्रण कुणाचे यात प्रशासनातच मतभिन्नता आहे.

जीर्ण तलाव ठरताहेत जीवघेणे
भंडारा : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात परिचीत असला तरी अनेक तलावाच्या पाळी जीर्ण झाल्या आहेत. सिंदपुरी तलावांची मालकी व त्यावर नियंत्रण कुणाचे यात प्रशासनातच मतभिन्नता आहे. निधींचा अभाव ही त्या-त्या विभागाची डोकेदुखी असली तरी जीर्ण तलावामुळे हे गाव मात्र जिवघेण्या स्थितीत असल्याचे वास्तव नाकारता येणारे नाही.
सिंदपूरी येथे मागील आठवड्यात मालगुजारी तलावाची पाळ फूटून ६० ते ७० घरे पडली होती. ओलाव्यामुळे आणखी काही घरे पडण्याच्या स्थितीत आहेत. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आपादग्रस्त तथा नैसर्गिक संकटप्रसंगी शासन खंबीरपणे उभा राहण्याची घोषणा करीत आहेत. दुसरीकडे सिंदपूरी येथे मानवनिर्मित चुका व दुर्लक्षामुळे ३९१ कुटुंबांचे गाव बाधित झाले. या गंभीर समस्येला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
सिंदपुरी गावापासून एक ते सव्वा कि.मी. अंतरावरील मालगुजारी तलाव आहे. शेतातीलच माती पाळीवर टाकण्यात आली. मातीची पाळ असलेल्या मोठ्या तलावाला सिमेंटचे अस्तरीकरण करण्याचा नियम आहे. जिथे मुरुमाची पाळ असते, तो तलाव सुरक्षित मानला जातो. परंतु तशी स्थिती याठिकाणी नाही.
पश्चिचमेकडून शिरले पाणी
तलावाची पाळ फुटल्यावर सर्वप्रथम सिंदपुरी गावाच्या पश्चिमेकडील शेतातून पाण्याचा लोंढा आला. गावातील दोन सख्खे वयोवृद्ध भाऊ शंकर व सदाशीव उरकुडे यांच्या घरामागे पाण्याने वेढा घातला. हे दोन भाऊ परिसरात राम-लक्ष्मण म्हणून परीचीत आहेत. सोबत राहण्याचा संकल्प घेतलेली ही भावंडे हलाखीच्या स्थितीत जगर आहेत. त्यांना घरकुल मिळाले. निराधार योजनेच्या मानधनावर त्यांचे जगणे सुरू आहे. यांच्यासारखेच गिरीसाव बिसने, बिसन मोडकू शहारे आणि त्यांची पत्नी सीताबाई हे सुद्धा यांचेही घर पडले असून पडक्या घरातच ते वास्तव्य करीत आहेत. शहारे यांच्या घरातील धान्य वाहून गेले. शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांच्या उदरभरणाचा प्रश्न जटील झाला आहे.
गरजू लाभापासून वंचित
सिंदपुरी येथे तलावाच्या पाण्यामुळे घरे क्षतिग्रस्त झाले, अशा ग्रामस्थांची नावे मदतीच्या यादीत नाहीत तर ज्यांच्या घरांचे अल्प नुकसान झाले त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप शिवराम हलमारे या वृद्धाने केला.
वास्तव्यात अडचणी
घरे पडलेले अथवा राहण्यायोग्य नसणारे ग्रामस्थ सध्या विष्णु मंदिर, हनुमान मंदिरात वास्तव्याला आहेत. सामूहीक भोजन व राहणे असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शौचालय समस्या आहे. मंदिरालगत शेतशिवार आहे. तिथे विषारी किटकांपासून धोका नाकारता येत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी तलावाला भेट देऊन समस्या जाणून घेतली. तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मदत न मिळाल्याने ग्रामस्थांत असंतोष कायम आहे.
पालकमंत्री फिरकले नाही
भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री राजेंद्र मुळक चार दिवसापूर्वी येऊन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु सिंदपूरी येथील आपादग्रस्तांना व घटनास्थळाला भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही.