घरकुलच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले
By Admin | Updated: June 29, 2017 00:43 IST2017-06-29T00:43:23+5:302017-06-29T00:43:23+5:30
घरकुलाच्या मागणीसाठी सोड्यावासीयांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची खासदार नाना पटोले यांनी भेट घेतली.

घरकुलच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले
नाना पटोले यांनी घेतली भेट : सोंड्यावासीयांचे घरकुलासाठी होते उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : घरकुलाच्या मागणीसाठी सोड्यावासीयांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची खासदार नाना पटोले यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंदपुरीच्या धरतीवर घरकुल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
सोंड्या येथील ग्रामस्थ मागील १० वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित होते. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन सादर करून घरकुल देण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाने याबाबीकडे दुर्लक्ष केले. पंचायत समिती तुमसरसमोर सर्व मंजुर झालेल्या घरकुलाचे बांधकाम त्वरीत करण्याचे व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी करून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषण मंडपाला आज खासदार नाना पटोले यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी सिंदपुरी धर्तीवर घरकुल देण्याचे आश्वासन दिले. यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी खा. नाना पटोले यांनी उपोषणकर्ते देवानंद लांजे, नरेंद्र घोडेस्वर, लांजे, दादू लांजे, हेमराज लांजे, अनंतराव परतेती, मुलचंद नागपुरे, आशा लांजे, हरीदास लांजे यांना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले. यावेळी बंडू बनकर यांच्यासह ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.