बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखली प्रवासी रेल्वे
By Admin | Updated: October 6, 2015 00:43 IST2015-10-06T00:43:07+5:302015-10-06T00:43:07+5:30
बावनथडी प्रकल्प वितरिकेला रेल्वे प्रशासन रेल्वे क्रॉसिंगची परवानगी देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखली प्रवासी रेल्वे
महकेपार येथील घटना : तीन तास रेल्वे रोखली
तुमसर : बावनथडी प्रकल्प वितरिकेला रेल्वे प्रशासन रेल्वे क्रॉसिंगची परवानगी देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. याचा निषेध करण्याकरिता मध्यप्रदेशातील दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास महकेपार रेल्वे स्थानकावर प्रवाशी रेल्वेला तीन तास रोखून धरले.
तिरोडी-तुमसर रेल्वे क्रमांक ५८८१६ (टी.टी.) सकाळी ८.१५ वाजता तिरोडी रेल्वे स्थानकावरून महकेपारकडे रवाना झाली. १० कि़मी. अंतरावर महकेपार रेल्वे स्थानकावर परिसरातील दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकाला घेराव केला. रेल्वे चालकाला रेल्वे ट्रॅकवर खूप मोठा जनसमुदाय दिसला. प्रवाशी रेल्वे चालकाने रेल्वे स्थानकाच्या बाहेर आऊटरवर थांबविली. आंजनबीटी, दिगरा व कोडंबी येथील शेतकऱ्यांचा यात समावेश होता.
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी पाहिजे. एका पाण्यामुळे धानपीक हातचे जाण्याची शक्यता आहे. बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाच्या वितरिकेचे काम रेल्वे ट्रॅकपर्यंत पूर्ण झाले आहे. पलीकडे रेल्वे क्रॉसिंगची परवानगी रेल्वे प्रशासन देण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी रेल्वे रोको करण्याचा निर्धार केला. यापुढे मोठे आंदोलन करण्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला.
दीड तासानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान आंदोलन उग्र झाले होते. येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे तिरोडी येथील रेल्वे मास्तरने प्रवाशी गाडी का सोडली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महकेपार येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिरोडी येथे आंदोलक जमा असल्याची माहिती कां? दिली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (तालुका / शहर प्रतिनिधी)
तुमसर रोड येथे तुमसर-तिरोडी रेल्वे प्रवाशी गाडी सकाळी ९.१५ वाजता येण्याची वेळ असून रेल्वे रोकोमुळे ती दुपारी १२.१५ वाजता आली. रेल्वे रोखण्याचे सविस्तर कारण मला माहित नाही. अधिक माहितीकरिता रेल्वे अभियंत्यांशी संपर्क साधा.
-आर.जी. भोवते, स्टेशन प्रबंधक तुमसर रोड.
या प्रकरणाची मला माहिती देता येणार नाही. याकरिता नागपूर येथील दक्षिण पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
-एच. हरीश, रेल्वे उपअभियंता तुमसर रोड.