शेतकरी धडकले पाटबंधारे कार्यालयावर
By Admin | Updated: September 29, 2014 22:59 IST2014-09-29T22:59:52+5:302014-09-29T22:59:52+5:30
रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोश करडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर

शेतकरी धडकले पाटबंधारे कार्यालयावर
चौकशीची मागणी : रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोश
करडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर पासून शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र वाटपावर गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही.
दि.२९ सप्टेंबरपर्यंत करडी परिसरात पाणी पोहचले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेवून गैरप्रकार केल्याचा आरोप करीत शेकडो शेतकरी तिरोडा तालुक्यातील सितेपार येथील कार्यालयावर धडकले. परंतु कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पळाले. प्रकरणी चौकशी आणि शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावी रिसाळा जलाशयाचे पाणी वाटप करण्याचे, नियंत्रण व देखभाल दुरूस्तीचे अधिकार असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर आहे. परंतू सदर ठिकाणी अधिकारी बसत नसल्याने कर्मचाऱ्यांवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे अनेकदा दिसून येते. कर्मचाऱ्यांचे बेबंदशाही धोरण येथून राबविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून अनेकदा होतो. परंतू अधिकारी दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलेले आहे. पाणी वाटपात गैरप्रकार करणे नेहमीचे होऊन बसले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहचविता सुरूवातीलाच पाण्याचे वाटप केले जाते. ओलिताचा कर वसूल केला जात असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. कोरड्या दुष्काळाने उत्पन्नात घट होते ती वेगळीच.
दि.२४ सप्टेंबर २०१४ पासून रिसाळा जलाशयाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र ५ दिवसाचा कालावधी लोटत असताना शेवटच्या टोकावरील करडी व मुंढरी शेतशिवारात पाणी पोहचले नाही. करडी येथील कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने ठाणा कालवा व कनार कालवा कोरडा आहे. परिसरातील शेतीला भेगा पडल्या असून पिके करपली आहेत. त्वरित पाण्याची गरज असताना जलाशयाजवळील शेतकऱ्यांनाच पाण्याचा लाभ दिला जात आहे. पाणी सोडलेले असताना पाणी वाटपाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी अजुनपर्यंत विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्यावर पोहचलेले नाही. बेबंदशाहीचा प्रकार सर्रास सुरू आहे. संतप्त करडी येथील शेकडो शेतकरी दि.२८ सप्टेंबर रोजी सितेपार कार्यालयावर धडकले असता कार्यालयात कोणतेही कर्मचारी वा अधिकारी दिसून आले नाहीत.
कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी पळाले असल्याची शंका आहे. आक्रोशित शेतकऱ्यांनी रिसाळा जलाशयातून निघणाऱ्या कालव्याचे निरीक्षण केले असता मुख्य कालव्याच्या उपशाखांचे सर्व गेट तोडलेले दिसून आले. त्याकडे कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम म्हणून करडी पर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे नापिकी होवून शेतकऱ्यांवर उपासमारिची वेळ आहे. शेतीला त्वरित पाणी न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यांचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून मुख्य कालवा कापून काही शेतकऱ्यांना पाणी वाटप केला जात असल्याचा आरोप आहे.
प्रकरणी चौकशी करावी अन्यथा न्यायासाठी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकरी निलेश इलमे, निलेश काढवे, नत्थू गाढवे, भागवत डोहळे, होलू शहारे, राजेश तिजारे, वासुदेव साठवणे, राजेश भारतकर, प्रकाश हलमारे, राजेश डोहळे, शामराव मोहतुरे, शिवराम कावळे, बाळू सार्वे, जगदिश मुलतानी, अमोल पालांदूरकर, टिनू राऊत, नामदेव खोब्रागडे, भाऊराव मोटकरे, शामू पंचबुद्धे व अन्य शेतकऱ्यांनी प्रसिद्धी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)