दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी प्रगती करावी
By Admin | Updated: December 6, 2015 00:31 IST2015-12-06T00:31:01+5:302015-12-06T00:31:01+5:30
दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी उत्तम पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी गोधनाची जोपासना करून या व्यवसायातून आपली आर्थिक प्रगती साधावी,

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी प्रगती करावी
विरली येथे दुग्ध स्पर्धा : प्रदीप बुराडे यांचे प्रतिपादन
विरली (बु.) : दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी उत्तम पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी गोधनाची जोपासना करून या व्यवसायातून आपली आर्थिक प्रगती साधावी, असे प्रतिपादन जि.प. सदस्य प्रदीप बुराडे यांनी केले. ते येथील गांधी मैदानावर आयोजित पशुवंध्यत्व शिबिर, दुग्ध स्पर्धा व संकरीत वासरांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत येथील पशुवैद्यकीय दवाखाना आणि लाखांदूर पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखांदूर पं.स. चे उपसभापती वासुदेव तोंडरे तर प्रमुख अतिथी म्हणून विरली (बु.) च्या सरपंच अर्चना महावाडे, उपसरपंच लोकेश भेंडारकर, वि.का.से. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी ब्राम्हणकर, लाखांदूर पं.स. चे पशुधन विकास अधिकारी डॉ.रुचा लांजेवार, गुंडेराव बागडे, डॉ.संभाजी चुटे, राजेश महावाडे, वैशाली चुटे, तुकाराम बगमारे, ग्रामसेवक मनोज वरुडकर, हरिश्चंद्र डहाके, भारत काटेखाये, विकास वैद्य, मधुकरू मस्के, दिलीप शिंगाडे, गजानन ठाकरे, पो.पा. एकनाथ भेंडारकर किसान पशुपालक मंडळाचे अध्यक्ष जीवन नखाते, चप्राडचे पशु पर्यवेक्षक डॉ.गोस्वामी, डॉ.पवार आदी उपस्थित होते.
या पशु वंधत्व निवारण शिबिरात ६९ जनावरांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले. तर संकरीत वासरांच्या मेळाव्यात ७६ कालवडींची नोंद करण्यात आली व त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची बक्षिसे उत्कृष्ट जनावरांना देण्यात आली. दुग्ध स्पर्धा योजनेत गावातील २२ संकरीत गाई सहभागी करून घेण्यात आल्या होत्या. त्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
तत्पूर्वी प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे फलक अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान मान्यवर पाहुण्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ.रुचा लांजेवार यांनी पशुपालकांना योजनेविषयी सविस्तर माहिती दिली आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामवासियांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनकुसरे यांनी तर आभार डॉ.जी.आर. कंगाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किसान पशुपालक मंडळाच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. (वार्ताहर)