शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले

By Admin | Updated: June 11, 2015 00:32 IST2015-06-11T00:32:37+5:302015-06-11T00:32:37+5:30

मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा ...

Farmer's scheme of employment has worsened | शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले

शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले

पावसाची प्रतीक्षा : हवामानावर बळीराजाची नजर, यांत्रिक शेतीचा फटका, खतांच्या किमती गगनाला भिडल्या, बोगस बियाणे बाजारात दाखल
मासळ : मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा लहरीपणा यासह अन्य बाबींमुळे शेतकऱ्यांचे तूर्तास खरीप हंगामाचे आर्थिक व इतर नियोजन बिघडल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील लग्नसराई जवळपास संपली आहे. लगेच रोहिणी नक्षत्र सुरू झाले. परंतु मशागतीला पूरक असा पाऊस न पडल्याने शेतकरी खरिपाच्या हंगामाकरिता संभ्रमावस्थेत सापडला आहे. गेल्या दोन तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने वातावरणातील तापमान कमालीचे घटले. त्यामुळे शेतकऱ्याला एक आशेचा किरण झळकला.
लगेच खरिपासाठी शेतजमिनी तयारीला लागला. परंतु लहरी व बेभरवशाच्या पावसाने पाठ फिरवली व तापमानात पुन्हा वाढ झाली. मौसमी वाऱ्यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही विलंब केला ते आपल्यापर्यंत पोहचतील की नाही, याचीही शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. रोहिणीचा हलका पाऊस जरी झाला तरी शेतकरी मृगामध्ये धुळपेरणीस हिम्मत करतो. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे यावर्षी सुद्धा धुळपेरणी करावी की नाही, या विवंचनेत सध्या शेतकरी गुरफटला आहे.
बहुतांशी शेतकरी दुबार पेरणी टाळण्यासाठी चिखलपेरणी म्हणजे खारी घोटून पऱ्हे भरण्याच्या विचारात आहेत. तर काही शेतकरी आवत्या म्हणजे बाशी करण्याच्या तयारीत आहेत. परंतु इथेही शेतकरी भीतीने ग्रासला आहे. कारण रोहिणीचा पाऊस पडला तर कचरा, तण काढण्यास शेतकऱ्यांना सोयीचे होते परंतु रोहिणी नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना हवामान खात्याचे अंदाज मात्र, शेतकऱ्यांच्या नियोजनात बाधा आणत आहेत. करावे तरी काय, सध्या पेरणीबाबत तर नियोजन बिघडल्याचेच दिसत आहे.
जमिनीचा पोत टिकून राहावा, किडीचा प्रादुर्भाव जास्त होवू नये यासाठी शेतकऱ्यांचा शेणखताचा वापर अधिक करण्याकडे कल असतो. परंतु दिवेंदिवस घटत चाललेला पशुधन, चारा टंचाई, पशुखाद्यांच्या वाढत्या किंमती व ट्रॅक्टर व यांत्रिकशेती पद्धती यामुळे पाळीव प्राण्यांची संख्या घटत आहे. पर्यायाने शेणखत सुद्धा दुर्मिळ होत चालला आहे.
शेतीला पुरक असा दुग्ध व्यवसाय सुद्धा, दुधाला योग्य भाव नसल्याने परवडत नाही. आणि म्हणून दुभत्या जनावरांची संख्या घटलेली आहे. पर्यायाने शेणखताला सोन्याच्या भावात खरेदी करावा लागत आहे. उत्पादन वाढीसाठी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर करावा लागतो आहे. परंतु त्यांच्याही किंमती गगनाला भिडल्याने, शिवाय किटकनाशकांच्या किंमती आवाक्या बाहेरच्या असल्याने आर्थिक नियोजन सुद्धा बिघडण्याची दाट शक्यता पसरली आहे.
संकरित बियाणांचे पेव फुटले आहे. शासकीय यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शनाअभावी बोगस बियाणांना बळी पडण्याचा नेहमीचाच अनुभव शेतकऱ्यांना आहे.
अशा वेळी घरच्या शेतीत स्वत: तयार केलेले बियाणे वापरावे की, बाजारातील तथाकथित नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरावे याबाबतीत सुद्धा शेतकरी योग्य नियोजन करण्यात असमर्थ ठरत आहे.
माती परीक्षण प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य नसल्याने कोणता वाण वापरावा, खते किटकनाशके यांचा वापर कसा व किती करायचा, पाणी पुरवठ्याचे साधनांचा अभाव, क्षीण निर्णय क्षमता अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्यांच्या मनात घर केलेले आहे. त्यामुळे तूर्तास अनेक शेतकरी आर्थिक कोंडीत आहेतच शिवाय खरिपासाठी नियोजन कसे करावे, याही विवंचनेत सापडला आहे.
सध्यातरी मृगधारा बरसण्यापर्यंत शेतकऱ्यांचे नियोजन बिघडलेले दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmer's scheme of employment has worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.