कारखानदारांकडून शेतकऱ्यांची गळचेपी
By Admin | Updated: May 20, 2015 01:18 IST2015-05-20T01:18:53+5:302015-05-20T01:18:53+5:30
बेरोजगारांच्या हाताला काम व शेतकऱ्यांना दाम, मिळेल या आशेने देव्हाडा खुर्द येथे वैनगंगा शुगर अॅन्ड पॉवर कारखान्याची निर्मिती करण्यात आली.

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची गळचेपी
भंडारा : बेरोजगारांच्या हाताला काम व शेतकऱ्यांना दाम, मिळेल या आशेने देव्हाडा खुर्द येथे वैनगंगा शुगर अॅन्ड पॉवर कारखान्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, कारखानदारांकडून येथील कामगारांची व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. कारखानदारांनी योग्य न्याय न दिल्यास मनसे स्टॉईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी दिला आहे.
देव्हाडा परिसरातील सुमारे २५० एकरात कारखाना उभारण्यात आला. तालुक्यातील बेरोजगारांना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कारखान्याचा लाभ होईल, अशी भुलथाप कारखानदारांकडून देण्यात आली. सुरूवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर कारखानदारांनी येथील कामगार व शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शहारे यांनी केला आहे.
हा कारखाना पुर्ती समूहाचा असून कवडीमोल भावात तो लिलावात काढल्याचाही आरोप त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. निवडणुकीच्या दरम्यान मतदान पारड्यात पाडण्यासाठी आश्वासनांची खैरात दिली होती. मात्र मागील जानेवारीपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाने कारखान्याकडून थांबविण्यात आले आहे. यात ऊस वाहक करणारे ट्रॅक्टर चालक व मालक यांचाही समावेश आहे.
कारखान्याकडे पैसे थकित असल्याने अनेकांच्या मुला-मुलींचे लग्न लांबणीवर पडले आहेत तर अनेकांना सोसायट्या, बँकांचे कर्ज चुकता करायचे असल्याने त्याचा डोंगर वाढत चाललेला आहे. ट्रॅक्टर मालकांचे हप्ते थकित असल्याने कंपन्यांकडून ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. येथील कामगारांना नियमित करण्याचे दिलेले आश्वासनही हवेत विरले आहेत. मागील तीन महिन्यापासून कामगारांना वेतनही मिळालेले नाही. कारखाना संचालकांनी शेतकरी, शेतमजूर व कामगारांचे थकित पैसे त्वरित परत करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टॉईलने आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शहारे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)