खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: August 3, 2015 00:32 IST2015-08-03T00:32:58+5:302015-08-03T00:32:58+5:30
पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत.

खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट
नियमांना तिलांजली : शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत. सध्याला वरुण राजाच्या कृपेने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र धानाचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मतासाठी पायपीट करावी लागत आहे. खत विक्रेते ग्राहकांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेत आहेत. बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिलाची मागणी केली असता अरेरावी केली जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे बाराही महिने पिक काढले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंढा कोसरा परिसरातून सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास दहा खत विक्रेत्यांचे मोठमोठी दुकाने आहेत.
प्रशासनाकडून या दुकानदारांना काही नियमावली दिली आहेत. खताच्या पिशवीवर असलेली किमतीतच खत द्यावे, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, वाजवीपेक्षा जास्त पैसे घेऊ नये असे अनेक नियमांचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हे खत विक्रेते शासकीय नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांकडून लुटमार करीत आहेत. एका बॅगवर ३० ते ५० रुपये जास्त प्रमाणात घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात हटकले असता स्टॉक नाही, पुढे जा असे बोलल्या जात आहे.
साधी कच्च्या पावतीवर नाव लिहून बिल देत आहेत. त्या बिलावर दुकानाचे नाव, परवाना क्रमांक शेतकऱ्यांची लुटमार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रारी दिल्यात.
मात्र कोणतेही अधिकारी भिरकावून पाहत नाही. कोंढा कोसरा येथे अनेक खताचे डिलर आहेत. त्याची मोठमोठी खत, औषधांची दुकाने आहेत. हे दुकानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आाहेत. एकीकडे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला आहे तर दुसरीकडे अधिकारी खत दुकानदार मालामाल होत आहेत. हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
बाहेरून आलेला खताचा स्टॉक दुकानात न उतरवता कुणाच्या घरी बाहेरील गोदामात उतरविला जातो. दुकानात स्टॉक नाही म्हणून लिहिले जाते. कोंढा येथील दुकानदाराचे पालोरा परिसरात मोठमोठे गोदाम आहेत. येथेच स्टॉक ठेवला जात आहे. हे सर्व बोलके चित्र शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसते. मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही. (वार्ताहर)
आतापर्यंत आमच्याकडे तक्रार घेवून आलेला नाही आहो. शेतकऱ्यांनी खत दुकानदारांना बळी पडू नये, कोणत्याही खत विक्रेत्यांनी वाजवी भावापेक्षा जास्त पैसे मागितले किंवा पक्के बिल दिले गेले नाही तर कृषी विभागात येवून तक्रार करावी.
- आदेश गजभिये
तालुका कृषी अधिकारी, पवनी.