मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
By Admin | Updated: March 22, 2017 00:25 IST2017-03-22T00:25:14+5:302017-03-22T00:25:14+5:30
तालुक्यातील बेला या ठिकाणची शेती पिंडकेपार या गाव पुनर्वसनाकरिता संपादन प्रक्रियेमध्ये घेण्यात आली होती.

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
भंडारा : तालुक्यातील बेला या ठिकाणची शेती पिंडकेपार या गाव पुनर्वसनाकरिता संपादन प्रक्रियेमध्ये घेण्यात आली होती. या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. मात्र नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मोबदला मिळाला नाही. परिणामी या प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
या बेमुदत आमरण उपोषणाची अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार १ जानेवारी २०१४ पासून केंद्र शासनाने नवीन भूसंपादन कायदा अमलात आणला आहे.
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण राज्यात हा कायदा लागू आहे. भूसंपादन अधिनियम १८९४ मधील तरतुदीनुसार कलम ११ मधील ३१ जानेवारी २०१३ व त्यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या निवाड्याप्रमाणे मोबदला रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत कलम २४ च्या पत्रकानुसार कारवाई करणे बंधनकारक आहे. तसेच भूसंपादन अधिनियम १८९४ मधील कलम ४ च्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेले सर्व हितसंबंधित नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मोबदला मिळण्यास पात्र राहतील असेही नमूद केले आहे.
जानेवारी २०१५ मध्ये नवीन भूसंपादन कायद्याची कलम २४ प्रमाणे मोबदला निर्धारित करण्यात आला होता, तो अत्यल्प होता. परिणामी ९० टक्के बाधीत शेतकऱ्यांनी मोबदला मान्य केला होता. न्यायालयीन प्रक्रियेमध्येही यामध्ये आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. परंतु शासनाच्या वतीने काढण्यात आलेली अधिसूचना न्यायालयाला कळविण्यात आलेली नाही. सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत नवीन कायद्याप्रमाणे मोबदला मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला होता. सबब मंगळवारपासून या शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी राज्यपालांसह मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आदींना पाठविण्यात आली आहे.
उपोषण मंडपात आरती भिवगडे, शिला भिवगडे, डी.बी. कोचे, सुशिला कोचे, मुरलीधर वालदे, रिद्धीदेव कोटांगले, रुपा कोचे, राधिका भुरे, जयतुरा कोचे, सिंधू कोचे, गणेश भुरे, ताराबाई कोचे, बबीता कोचे, शोभा मते, रामा ठवकर, शैलेश कोटांगले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)