शेतकऱ्यांनो, केवळ भातपिकावरच अवलंबून राहू नका
By Admin | Updated: January 25, 2016 00:47 IST2016-01-25T00:47:42+5:302016-01-25T00:47:42+5:30
भंडारा जिल्ह्यात ९५ टक्के शेतकरी हे भातपिकाची शेती करतात. दुर्देवाने कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

शेतकऱ्यांनो, केवळ भातपिकावरच अवलंबून राहू नका
शेतकरी मेळावा : शुभांगी राहांगडाले यांचे आवाहन, मॉयल फाऊंडेशनचा उपक्रम
तुमसर : भंडारा जिल्ह्यात ९५ टक्के शेतकरी हे भातपिकाची शेती करतात. दुर्देवाने कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातही सततची नापिकी त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतो. परंतु आत्महत्या हे समस्येचे मुळ नाही. विपरीत परिस्थितीचा सामना करायचा असल्यास शेतकऱ्यांनी केवळ भातपिकारच अवलंबून न राहता विविध प्रकारची पर्यायी शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांनी केले.
मॉयल फाऊंडेशन द्वारा पुरस्कृत वायफ मित्र संस्थाद्वारे सामुदायीक विकास कार्यक्रमांतर्गत राजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मॉयलचे अभिकर्ता व चिखला मॉयलचे उपमहाव्यवस्थापक किशोर चंद्रकार, व्यवस्थापक विकास परिदा, जैन इरिगेशन सिस्टीम जळगावचे प्रविण सिद्धभडी, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.राजेश वासनिक, तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, डॉ.बी.एम. चोपकर, जिल्हा परीषद सदस्या संगीता सोनवाने, सरपंच रंजू मासुलकर, तोफलाल रहांगडाले, तेजराम देशमुख, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, कल्पना टेकाम, रमला कठौते, कविता, शशीकला उईके, अंतकला कोडवते, इंदिरा वहिले, उमा सेनकपाट, दिलीप सोनवाने, ठाकचंद मुंगुसमारे, राजू तोलानी, अशोक राहांगडाले, सुरेश राहांगडाले आदी मंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी शेतीविषयक, पशुधन, महिला सक्षमीकरण शाळा व अंगणवाडी विकासाअंतर्गत सुखसुविधा तसेच शेती विषयक अवजारे आदींचे वितरण करण्यात आले. त्यात विशेषत: शेतकऱ्यांच्या शेतीची माती परीक्षण करण्यात आली. त्याचप्रमाणे बायोगॅसचे वितरण, गोटफॉर्मची उभारणी व शाळेला खेळाच्या वस्तूंसह डेक्स बेंच, इलपिंग लॅपटॉप, प्रोजेक्टर आदी बायफ मित्र संस्थेतर्फे प्रदान करण्यात आले.
मॉयल फॉउंडेशनने जवळपासच्या ११ गावांना दत्तक घेतले असून त्या गावातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी बायफ व मित्र संस्था कार्यरत आहे. त्याच विकासात्मक कार्याचा भाग म्हणून राजापूर येथे ११ गावांचा शेतकरी मेळावा आयोजित केला गेला. प्रास्ताविक पवन पाटीदार यांनी केले. संचालन राजापूरचे उपसरपंच वसंत बिटलाये तर आभार प्रदर्शन महाप्रकाश परबते यांनी केले. कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत राजापुरचे पदाधिकारी कर्मचारी तसेच बायफ मित्र संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)