भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यापासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:24+5:302021-03-06T04:33:24+5:30
गोसे धरणाचा डावा कालवा लाखनी तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) शेत शिवारातून गेलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची सुपिक जमीन कालव्यात गेलेली आहे. ...

भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यापासून शेतकरी वंचित
गोसे धरणाचा डावा कालवा लाखनी तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) शेत शिवारातून गेलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची सुपिक जमीन कालव्यात गेलेली आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाकडून अल्प मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. आता या परिसरातील शेतकरी वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी एकवटले आहेत. नारायण भोयर या शेतकऱ्याला भूसंपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नसल्याने आर्थिक विवंचनेतून सदर शेतकऱ्याने १५ जुलै २०२० रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. ५ डिसेंबर २०१३ रोजी प्राप्त नोटीसाद्वारे हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला फारच अत्यल्प आहे. जवळपास एक लाख रुपये मंजूर करण्यात आले. भूसंपादन केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला अद्याप मिळालेला नाही. शेतकऱ्यांवर दडपण आणून अल्पमोबदला उचल करण्याची नोटीस देण्यात आली होती. यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे; मात्र मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर नाही. ऑगस्ट २०१४ अधिग्रहणानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव गुणांक दोन मंजूरनुसार तसेच पाच पट मोबदला मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा, योग्य मोबदला न मिळाल्यास जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत एक निवेदन देण्यात आले आहे.