पीक विम्यापासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:30 IST2017-03-18T00:30:04+5:302017-03-18T00:30:04+5:30
अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

पीक विम्यापासून शेतकरी वंचित
विमा कंपनीने नाकारली आर्थिक मदत : चौकशी अहवाल धुडकावला
चुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो. परंतु विमा कंपनी आर्थिक मदत धुडकावून लावत असल्याचा प्रकार रेगेंपार येथे उघडकीस आला आहे.
वैनगंगा नदी काठावर असलेल्या रेंगेपार (पांजरा) येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी सन २०१६ सत्रात २ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली होती. धानाची कापणी केली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धानाची नासाडी झाली. या धान पिकाचे विमा कवच शेतकरी नागपुरे यांनी काढले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी पैसा जमा केला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापण्यात आलेल्या धानाला कोंब फुटल्यामुळे धानाचे पीक हातात आले नाही.
यासंदर्भात सिहोरा येथील जिल्हा बँकेला माहिती देण्यात आली. याशिवाय अवकाळी पावसाने नुकसान झाला असल्याचा पंचनामा शेत शिवारात धान पिकांचा पंचनामा तलाठी एम.एस. दुबे, ग्रामसेवक बी. एस. राठोड, कृषी सहायक पी.पी. खंडाईत आणि सरपंच कौशल नागपुरे यांच्या चमुने केला आहे. धान पिकांचा अवकाळी पावसाने नुकसन झाला असल्याचा अहवाल चमूने दिला. जिल्हा बँकेच्या सिहोरा शाखेने हा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला असता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खासदार नाना पटोले यांचे जनता दरबार गाठले. सहा महिन्यानंतर पिक विमा कंपनीने सामुहिक शेतीचे नुकसान अशी अट लागू करीत आर्थिक मदत नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गावात अन्य शेतकऱ्यांसोबत याही शेतकऱ्याला जोडण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमुने प्रस्तावित अहवाल तयार केला आहे. नुकसान झाला असता महिती दिल्यानंतरही विमा कपंनीचे अधिकारी शेत शिवारात पोहचले नाही. कर्मचाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेत शिवारात उत्पादीत पिकांचा सुरक्षीत कवच व शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजना राबवित आहेत. पंरतु विमा कंपन्या शेतकऱ्यांसमोर अनेक भानगडी निर्माण करीत असल्याने शेतकरी विमा काढताना नाकारत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमूने अहवाल सादर केला असता विमा कंपनीने फेटाळून लावल्यामुळे शंकर नागपुरे हा शेतकरी पीक विमा योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठरला आहे. (वार्ताहर)
पीक विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विविध कारणांमुळे आर्थिक मदतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
- मंगेश बोरकर, व्यवस्थापक जिल्हा बँक, सिहोरा
पीक विमा योजनेचा प्रस्ताव चमूने चौकशी करुन तयार केला होता. हा प्रस्ताव धुडकावल्याने अन्याय झाला आहे. न्यायासाठी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे.
- शंकर नागपुरे, नुकसानग्रस्त शेतकरी रेंगेपार