शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 25, 2014 01:02 IST2014-10-25T01:02:15+5:302014-10-25T01:02:15+5:30
हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
पालांदूर : हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे. या सर्व धामधुमीत मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या घरात बसून असल्याचे दृश्य आहे. हाती पैसा नसल्याने खरेदी तर दूरच दोन वेळच्या जेवणासाठी तो चिंतातुर आहे. एकंदर जगाच्या पोशिंद्याची दिवाळी अंधारातच गेली आहे.
दिवाळी म्हटली की, नवनवीन वस्तूंची खरेदी आली. त्यानुसार बाजारपेठ गर्दीने फुगून गेली आहे. आमगाव या तालुकास्थळीही बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
ही गर्दी दिसून येत आहे ती शासकीय अधिकारी, कर्मचारी व व्यवसायीकांची. मात्र अवघ्या देशासह तालुक्याची अर्थव्यवस्था चालविणारा शेतकरी या गर्दीतून नदारद असून तो घरीच बसला आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना धानाची दुबार पेरणी करावी लागली. धानाला उशीर झाल्याने पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. बँक व सावकारांचे कर्ज डोक्यावर असताना उत्पादनाची आस धरून शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जाचा डोंगर उचलला व शेतीची मशागत केली.
काही ठिकाणी रोवण्या खोळंबल्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये हलका धान शेतकऱ्याच्या हाती लागतो.
शेतकरी कसाबसा दिवाळी साजरी करायचा. परंतु यावर्षी मात्र हलके धानही शेतकऱ्याच्या हाती लागले नसल्याने शेतकरी रिकाम्या हातीच आहे. चौरास भागात हलक्या धान कापणीला प्रारंभ झालेला आहे. हातात पैसा खेळणार कसा या विवंचनेत दिवाळीचा सण निघून गेला.
दिवाळीत कपडे, दागिने व चैनीच्यावस्तूंची खरेदी केली जाते. मात्र ही खरेदी फक्त अल्पशा कुटुंबातच केली जात असल्याचे दिसून येत आहे. तर शेतकरीवर्गाकडे लक्ष्मीपूजनासाठीही लक्ष्मी नसल्याने त्यांची दिवाळी थंड गेली. शेतकऱ्यांना फक्त शेतमालाच्या उत्पादनातूनच हे सर्व शक्य आहे. शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीला बोनस मिळतो. व्यापारीही आपल्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल करून मालामाल होतात. परंतू उभ्या जगाचा पोशिंदा मात्र आपली दिवाळी अंधारातच साजरी करतो. आम्हाला बोनस कधी मिळणार व तो कोण देणार, सरकार की निसर्ग अशी आर्त हाकही तो मारू शकत नाही ही व्यथा आहे. (वार्ताहर)