ई-पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:19+5:302021-09-16T04:44:19+5:30
शासनाच्या आदेशानुसार पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गत दीड महिन्यांपासून सुरू आहे. या ॲपच्या माध्यमातून गाव ...

ई-पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ
शासनाच्या आदेशानुसार पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया जिल्ह्यात गत दीड महिन्यांपासून सुरू आहे. या ॲपच्या माध्यमातून गाव नमुना १२ मध्ये पिकांची नोंद करण्यासाठी राज्यभर उपक्रम राबविला जात आहे. भंडारा जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ६१२ शेतकरी खातेदार आहेत. त्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतातील नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा आणि नुकसानभरपाई मिळणे सोपे जाणार आहे.
मात्र गत दीड महिन्यांपासून या पीक विमा पाहणी कार्यक्रमाचा धसका शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही. फोन असला तरी त्यावर नोंदणी कशी करावी हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेचाही अभाव आहे. त्यामुळेच आतापर्यंत केवळ एक लाख ५१५ शेतकऱ्यांचीच नोंदणी करणे शक्य झाले आहे. ३० सप्टेंबर ही नोंदणीची शेवटची तारीख असून या किचकट प्रक्रियेमुळे संपूर्ण शेतकऱ्यांची नोंदणी होणार काय, हा प्रश्न आहे.
बॉक्स
नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ई-पीक पद्धतीचे फायदे मोठ्या प्रमाणात असले तरी तंत्रज्ञानअभावी शेतकरी हतबल झाले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक नोंदणी करणे आवश्यक होते. परंतु तोपर्यंत जिलह्यातील अत्यल्प नोंदणी या ॲपद्वारे झाली होती. त्यामुळे या शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंद स्वत: शेतात जावून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ई-पीक नोंदणी
तालुका शेतकरी नोंदणी
भंडारा ३५२०२ ८०५६
पवनी ४१९४७ १६१०३
तुमसर ३८६९६ १७३११
मोहाडी ४०९९८ ११००३
साकोली २५६३० १५३२२
लाखनी ३२३५० १६४०३
लाखांदूर ३७७९४ १५३१७
एकूण २५२६१६ १००५१५