शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित
By Admin | Updated: July 10, 2014 23:26 IST2014-07-10T23:26:10+5:302014-07-10T23:26:10+5:30
यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले.

शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित
भंडारा : यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे.
मागीलवर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र शासनाची चमू येऊन पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करुन मदत घोषीत केली. त्यावेळी भंडारा जिल्ह्याला ४७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वाटपासाठी देण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी ५० लाख रुपये त्या-त्या तालुक्यांना वितरीत करण्यात आले.
यामध्ये भंडारा तालुक्याला ७ कोटी २४ लाख ७० हजार, पवनी तालुक्याला ७ कोटी २२ लाख ६९ हजार, तुमसर तालुक्याला ६ कोटी ६० लाख, मोहाडी तालुक्याला ६ कोटी ३० लाख १८ हजार, साकोली तालुक्याला ४ कोटी ४९ लाख ६८ हजार, लाखनी तालुक्याला ६ कोटी २३ लाख ३६ हजार, लाखांदूर ९ कोटी ३९ लाख ६८ हजार असे एकूण ४७ कोटी ५० लाख २९ हजार रुपये वितरीत करण्यात आले. सर्वच तालुक्यातील तहसील कार्यालयांना रक्कम पाठविण्यात आली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांच्या तक्रारी वाढत असल्या तरी अनेकांकडे खाते क्रमांक नाही, काहींचा संपर्क क्रमांक नाही, काहींचे आपसी वाद आहेत. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
यासंदर्भात साकोलीचे तहसीलदार हंसा मोहणे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ९५ टक्के लोकांना पैसे वाटप करण्यात आले असून केवळ २२ लाख रुपये शिल्लक आहे. ८०० ते ९०० शेतकऱ्यांमध्ये काहींकडे खाते नाही, काही परगावी राहत आहेत. काहींचे फेरफारमध्ये वारसान चढविण्यात आले नाही. त्यामुळे ही रक्कम शिल्लक आहे.
पवनीचे तहसीलदार दिलीप आखाडे म्हणाले, ७.२२ कोटी रकमेपैकी ६.४० कोटी रुपये वाटप करण्यात आली आहे. ऊर्वरीत रक्कम बँकेतील खात्याअभावी राहिलेली असल्याचे सांगितले.
खुटसावरी येथील शेतकरी नरेंद्र पोटवार म्हणाले, यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची अद्यापही आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी यावर्षी शासनाच्या मदतीची अपेक्षा कशी करायची? खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रब्बीमध्ये गारपीट कोसळूनही मदत मिळू शकली नाही. ही मदत कधी मिळेल?
खुटसावरी येथील शेतकरी कन्हैया भुते म्हणाले, मागीलवर्षी निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली. नुकसान भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत घोषितही केली. मात्र अद्यापही ही मदत बँकेच्या खात्यात पोहचलेली नसल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)