लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या बपेरा येथील शेतकऱ्यांना मध्य प्रदेशातील मोवाड सीमेवर लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात असणाऱ्या शेतावर ये-जा करताना शेतकऱ्यांना हेल्मेट सक्तीच्या नावावर लुटले जात आहेत. पोलिसांच्या तुघलकी फर्मानमुळे शेतकरी वैतागले आहेत. यामुळे हेल्मेट घालून शेतात जावे काय?, असा सवाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केला आहे.
बावनथडी नदीच्या वाढत्या पात्राने आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या बपेरा गावातील शेतकऱ्यांची बागायती शेती नदीच्या पात्रात गिळंकृत झाली. मध्य प्रदेश राज्याच्या दिशेने मातीचे ढीग तयार झाले. या ढिगावर बपेरातील शेतकऱ्यांची शेती असल्याने उत्पादन घेण्यासाठी ये-जा करीत आहेत. नदीच्या पात्रात पाणी असल्याने नदी पात्रातून ये-जा करता येत नाही. यामुळे हे शेतकरीभंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशातील मोवाड गावाचे हद्दीत जात आहेत. मोवाड ही मध्य प्रदेशातील आंतरराज्य सीमा आहे. याच गावाच्या हद्दीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती आहे. परंतु मोवाड सीमेवर मध्य प्रदेशातील खैरलांजी पोलिस स्टेशन पोलिस हेल्मेटच्या नावावर लूट करीत आहेत.
दुपारी २ वाजता सुमारास पोलिस सीमेवर दाखल होत आहेत. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणाऱ्या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसल्यास २०० रुपये दंड आकारला जात आहे. हाच फटका बपेरा गावातील शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीवर जाताना सहज कुणी शेतकरी हेल्मेट घालत नाही. दिवसातून ४ ते ५ वेळा ये- जा करावी लागत असल्याने शेतकरी हेल्मेट घेत नाही.
"बपेरा येथील शेतकरी नदी पात्रातील मातीत भाजीपाला उत्पादन घेत आहेत. यामुळे त्यांचे येणे असते. मात्र मध्य प्रदेशातील पोलिस मोवाड सीमेवर हेल्मेटच्या नावावर लूट करीत आहे." - हिरा उपरीकार, शेतकरी, बपेरा (महाराष्ट्र)
"मध्य प्रदेशातील मोवाड सीमेवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लूट होणार नाही. यात लक्ष घातले जाईल." - गौरव पारधी, आमदार कटंगी (मध्य प्रदेश)