उसर्रा येथील शेतकरी मदतीपासून वंचित
By Admin | Updated: July 2, 2015 00:47 IST2015-07-02T00:47:02+5:302015-07-02T00:47:02+5:30
दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला.

उसर्रा येथील शेतकरी मदतीपासून वंचित
उसर्रा : दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला. पण वनविभागाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नसून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.
अशोक संपत चौधरी (४५) असे रानडुकराने हल्ला केलेल्या जखमीचे नाव आहे. उसर्रा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काम सुरु होते. दिनांक १० जूनला मध्यान्तर सुटीनंतर सदर मजूर लघुशंकेसाठी झुडुपाखाली गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्ला केला. त्यात अशोक चौधरी यांच्या डाव्या पायाला व कंबरेला जबर जखम झाली. त्यानंतर त्यांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुमसर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील कारवाई साठी वनविभाग कांद्री तसेच आंधळगाव हद्दीतील घटना असल्याने आंधळगाव पोलिसात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले असल्याचे जखमी इसमास सांगितले. पण २० दिवसांचा काळ होऊनही वनविभाग कांद्रीच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा साधा पंचनामा घेण्यात आला नसल्याने जखमी इसमाने कमालीचा संताप व्यक्त केला आहे.सदर जखमी इसमाच्या कुटुंबात कमावणारा एकच असल्याने त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार? वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी अशोक चौधरी यांनी केली आहे. (वार्ताहर)