शेतकरी वळला ऊस शेतीकडे
By Admin | Updated: April 4, 2015 00:15 IST2015-04-04T00:15:23+5:302015-04-04T00:15:23+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक शेती क्षेत्रात धानाचे उत्पादन शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात घेतात.

शेतकरी वळला ऊस शेतीकडे
आसगाव : जिल्ह्यात सर्वाधिक शेती क्षेत्रात धानाचे उत्पादन शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात घेतात. ऊर्वरित महिन्यात शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नव्हते. परंतु, आता ही स्थिती पालटली आहे. जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकांच्या उत्पादनाकडे वळले आहेत. उडीद, मूग, पोपट, बरबटी, हरभरा, वाटाणा आदी कडधान्य पिकांसह शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे.
भंडारा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र कमी असले तरी सर्वसाधारणपणे आॅक्टोबर महिन्यानंतर ऊसाची लागवड केली जाते. विविध प्रकारच्या वाणांची लागवड शेतकरी शेती ज्ञानानुसार करीत आहेत.
पवनी तालुक्यातील नदी काठालगतच्या गावांमध्ये कठाण पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय अनेक शेतकरी ऊस लागवडही करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा ऊस फेब्रुवारी ते मार्चदरम्यान कापणीला येत असल्याने याचा पुरवठा बाहेर राज्यात तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव असलेल्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो.
शंकरपट, यात्रा, मंडई आदी ठिकाणी ऊसाची विक्री केली जाते. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पादन प्राप्त होत असल्याने अनेक शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले आहेत. परिणामी जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र दिवसें दिवस वाढत आहे. (वार्ताहर)