शौचालयाचा वापर करणारे कुटुंब होणार ‘लय भारी’
By Admin | Updated: December 9, 2015 00:46 IST2015-12-09T00:46:03+5:302015-12-09T00:46:03+5:30
सातत्याने आणि नियमितपणे गाव हागणदारीमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे संनियंत्रण करण्यासाठी ग्रामस्तरावर सामुदायिक स्वच्छता कार्ड ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

शौचालयाचा वापर करणारे कुटुंब होणार ‘लय भारी’
स्वच्छता कार्ड संकल्पना घरावर लागणार हिरवा, पिवळा, भगवा, लाल रंगाचा लागणार स्टिकर
भंडारा : सातत्याने आणि नियमितपणे गाव हागणदारीमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे संनियंत्रण करण्यासाठी ग्रामस्तरावर सामुदायिक स्वच्छता कार्ड ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यावर्षी कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायतीमधील शौचालयाच्या स्थितीनुसार प्रत्येक घरावर हिरवा, पिवळा, भगवा, लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. शौचालयाचा वापर करणारे पूर्ण कुटूंबाचे घर आता ‘लयभारी’ ठरणार आहे. या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता जागरण मंचची स्थापना करण्यात येणार आहे.
राज्यभरात सामुदायिक संचालित हागणदारीमुक्त नियोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेनंतर गावस्तरावर हागणदारीमुक्त गाव करण्याच्या प्रक्रियेसाठी संनियंत्रण करण्यात येणार आहे. याकरिता गावस्तरावर समुदाय स्वच्छता कार्ड या संकल्पनेला सुरूवात करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात सन २०१५-१६ च्या वार्षिक कृती आराखड्यातील ६४ ग्रामपंचायतमध्ये या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतस्तरावर समुदाय स्वच्छता कार्ड संकल्पनेची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिक ठिकाणी समुदाय स्वच्छता प्रगतीपथक लावण्यात येणार असून या पत्रकामध्ये हिरवा, पिवळा, भगवा, हिरवा रंगाच्या स्टिकरची स्थिती शौचालय वापर करणाऱ्या कुटूंबाच्या उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे. प्रत्येक कुटूंबाकडील शौचालयाच्या स्थितीनुसार घरांवर हिरवा, पिवळा, भगवा, लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येतील. शौचालयाचा वापर करणाऱ्या पूर्ण कुटूंबाच्या घरावर हिरवा रंगाचा ‘लयभारी’ संदेश असलेला स्टिकर लावण्यात येईल.
शौचालय असलेले परंतु कुटूंबातील काही सदस्य बाहेर शौचास जात असलेल्या घरावर पिवळ्या रंगाचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ असा संदेश असलेला स्टीकर तर घरात शौचालय आहे, परंतु वापरायोग्य नाही अशा घरावर भगव्या रंगाचा ‘जरा जपून’ असा संदेश असलेला स्टिकर तर उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटूंबाच्या घरावर लाल रंगाचा ‘खतरा’ असा संदेश असलेला स्टिकर लावून गावातील कुटूंबाकडील उपलब्ध शौचालयाच्या स्थितीची माहिती सार्वजनिकरित्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
या स्थितीवरून नागरिकांमध्ये शौचालय बांधकाम, वापर, स्वच्छतेसाठी जनजागृती होण्यास मदत होणार असून उघड्या हागणदारीमुक्तीच्या समुळ उच्चाटनासाठी व गाव हागदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता जागरण मंचाची स्थापना ग्रामपंचायतस्तरावर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर निर्माण होणाऱ्या स्वच्छता जागरण मंचाच्या वतीने शौचालय नसलेल्या कुटूंबाना बांधकाम करण्यास प्रेरित करणे, वापर न करणाऱ्या कुटूंबाना शौचालय वापरासाठी प्रवृत्त करणे, नव्याने शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याविषयी मार्गदर्शन करणे, स्वच्छतेच्या सवयींचा गावांमध्ये प्रचार करणे, स्वच्छताविषयक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेणे, कुटूंबाच्या शौचालयावर वापर स्थितीदर्शक स्टिकर्स परिस्थितीनुरूप चिकटविणे, समुदाय स्वच्छता कार्ड अद्यावत करणे, मासिक स्वच्छता दिनी गावामध्ये शौचालय बांधकाम करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करणे आदी कार्य करून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)